
लेखी आश्वासनानंतर उड्डाणपूल मागणीसाठीचे उपोषण मागे
वासिंद, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर वासिंद खातिवली येथील क्रॉसिंगवर उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके यांच्या नेतृत्वाखाली खातिवली, वासिंद ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी (ता. २१) पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन लेखी आश्वासन देत मागण्यांची पूर्तता करण्याचे मान्य केल्याने हे बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाला आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटना, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला. दरम्यान, उपोषणाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग अधिकारी दिलीप पाटील, नायब तहसीलदार दयाराम वळवी, व बी. डी. चौधरी यांनी लेखी आश्वासन देत मागण्यांची पूर्तता करण्याचे मान्य केल्याने हे बेमुदत उपोषण मागे घेण्यात आल्याचे उपोषणस्थळी असलेले कार्यकर्ते प्रशांत महाजन व सागर कंठे यांनी सांगितले.