जयसिंघानी बाप-लेकीला पोलिस कोठडी

जयसिंघानी बाप-लेकीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिल याला मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुजरातमधून रविवारी (ता. १९) रात्री अटक केली होती. मलबार हिल पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीच्या पोलिस कोठडीतही शुक्रवारपर्यंत (ता. २४) वाढ करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जयसिंघानीची मुलगी अनिक्षाविरुद्ध ब्लॅकमेल, धमकावणे आणि एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर अनिक्षाला १६ मार्चला अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज सुनावणीवेळी अनिक्षाची अजून ७ दिवसांची कोठडी पोलिसांनी मागितली होती; परंतु न्यायालयाने ४ दिवस (२४ मार्चपर्यंत) पोलिस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानीही पोलिसांच्या रडारवर होता. ७२ तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास अनिल जयसिंघानीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुजरातमधून अटक केली.

आरोपी अनिक्षा जयसिंघानी पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनिक्षाला या दोघांसमोर बसवून पोलिस चौकशी करणार आहेत. अनीक्षाने बंद लिफाफ्यात अमृता फडणवीस यांना चिठ्ठ्या दिल्या असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याचा मजकूर पोलिसांकडून तपासला जात आहे. सांकेतिक भाषेत हा सर्व मजकूर असल्याचे समजते.
------

व्हिडीओची चौकशी
आरोपी अनिक्षाकडून इंटरनेटसाठी वापरण्यात येणारा डोंगल पोलिसांनी जप्त केला आहे. यात जवळपास १०० जीबीपेक्षा जास्त डाटा वापरल्याचे बोलले जाते. पोलिस तपासात काही व्हिडीओंसंदर्भातही माहिती उघड झाली आहे. त्यातील एका व्हिडीओत अनिक्षा बॅगमध्ये पैसे भरताना दिसते. ते पैसे कुठे आहेत, कुठून आणले होते, याचा पोलिस तपास करत आहेत. कुठल्या परिस्थितीत व्हिडीओ बनवले याचीही माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांनी संगनमताने कट रचला होता का, यामागे कोण आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com