मुंबईसह महामुंबईत धो... धो...

मुंबईसह महामुंबईत धो... धो...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : भारतीय हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा वर्तवलेला अंदाज खोटा ठरवत आज मुंबई, ठाण्यात धो-धो अवकाळी पाऊस बरसला. अगदी पहाटेपासूनच अवकाळी पावसाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांची मात्र एकच तारांबळ उडाली. राज्यात पुढे काही दिवस हवामान कोरडे राहणार असून मुंबई परिसरात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

मुंबईत रात्रीपासूनच पावसाळी वातावरण तयार झाले होते. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडटासह मुंबईत पावसाला सुरुवात झाली. रात्री दोन-तीनच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या; मात्र पहाटे ५ नंतर पावसाचा जोर वाढला. धुवाधार पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांना पावसामुळेच जाग आली. पावसासह जोराचे वारेदेखील सुटले होते. अगदी जून महिना भासावा, असा पाऊस कोसळला.

मुंबईसह उपनगरांनाही पावसाने झोडपून काढले. वांद्रे, दहिसर, जुहू, भायखळा, सायन, मुलुंड, अंधेरी, विक्रोळी परिसरात पावसाचा जोर बघायला मिळाला. याशिवाय भाईंदर, मिरा रोड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्येही पावसाचा जोर राहिला. डहाणू, अलिबागमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग केली. सकाळीदेखील आकाशात काळे ढग जमा झाल्याचे दिसत होते. साधारणतः चार-पाच तासांनंतर पावसाचा जोर ओसरायला लागला.

वाहतूक विस्कळित
मुंबईत चार ते पाच तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबल्याचे दिसले. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. काही ठिकाणी तर रस्त्यांवर चक्क खड्डे पडले. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील पेव्हरब्लॉक उखडल्याचे दिसले. सकाळी पावसाचा जोर असल्याने लोकल वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवला. मुंबईतील बेस्ट वाहतूक सुरळीत सुरू होती.

राज्यात पुन्हा अवकाळी?
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे ढग असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला. राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त पश्चिम वाऱ्यांमुळे पावसाळी वातावरण तयार झाले. परिणामी मुंबई आणि परिसरात पाऊस झाला. उद्याही (ता. २२) काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
- सुषमा नायर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, मुंबई हवामान विभाग

आजचा पाऊस (मिमीमध्ये)
कुलाबा - २५ 
सांताक्रूझ - १७
वांद्रे १३ 
दहिसर - २९ 
जुहू - २१ 
भायखळा - ३१
सायन - २४.५  
भाईंदर - १३
मिररोड - १०.५ 
अलिबाग - ८
डहाणू - ३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com