
महात्मा गांधीच्या नात उषा गोकाणी यांचे निधन
मुंबई, ता. २१ ः महात्मा गांधी यांच्या नात उषा गोकाणी (वय ८९) यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. मागील पाच वर्षांपासून उषा गोकाणी या आजारी होत्या. मणिभवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम अजगावकर यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले.
त्यांनी आपले बालपण सेवाग्राम येथे घालवले. गोकाणी या मुंबई येथील गांधी स्मारक निधीच्या माजी अध्यक्ष होत्या. २ ऑक्टोबर २०१५ रोजी मणिभवन हे तत्कालीन गांधी मेमोरियल सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आले. १९१७ ते १९३४ या काळामध्ये महात्मा गांधी अनेकदा मणिभवनात राहिलेले आहेत. मणिभवन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार राहिले आहे. मणिभवनमध्येच गांधी स्मारक निधी आणि मणिभवन गांधी संग्रहालय या संस्था आहेत. २०१६ मध्ये उषा गोकाणी यांचे भाऊ आणि महात्मा गांधी यांचे नातू कानू रामदास गांधी यांचे निधन झाले होते. त्यानंतर उषा यांच्या निधनाने गांधी विचारवाद्यांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.