वसंत साठे यांचे ९० व्या वर्षात पदार्पण

वसंत साठे यांचे ९० व्या वर्षात पदार्पण

मोखाडा, ता. २२ (बातमीदार) ः मोखाड्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचे व्यवस्थापक वसंत साठे यांनी पालघरसह नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांत विविध समाजोपयोगी कामे करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून ते आदिवासी भागात हे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. वसंत साठे वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त देवबांध येथे गुरुवारी (ता. २३) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंत साठे यांनी मोखाड्यातील देवबांध येथील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून मोखाडा, जव्हार तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सुमारे ४० हजार गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य मोफत दिले आहे. देवबांध येथे आरोग्य शिबिरेही भरवली आहेत. दोन वर्षे कोरोना काळात उपासमारीत अडकलेल्या सुमारे तीन हजार ५०० कुटुंबांना अन्न, धान्याचे किटवाटप केले आहे.

विविध पुरस्कारांनी गौरव
वसंत साठे यांच्या कार्याची दखल घेऊन बोईसर येथील वर्तक विद्यालयाने डॉ. स. दा. वर्तक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवले आहे. औरंगाबादच्या अर्पण शिक्षण संस्थेचा समाजभूषण पुरस्कार, ठाण्यातील ईमेज वेल्फेअर अॅचिव्हर फोरमचा समाजरत्न पुरस्कार, डोंबिवलीमधील पुलोत्सव समितीने पु. ल. कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सासवडच्या राजीव साबळे फाऊंडेशनचा ग्रामीण विकास पुरस्कार; तर सह्याद्री मानव सेवा मंचने सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. या पुरस्कारांसह वसंत साठे यांना अनेक पुरस्कार तसेच त्यांचा विविध ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. वसंत साठे आता वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे देवबांध येथे गुरुवारी (ता. २३) स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com