
डोंबिवलीत मराठी वेशभूषांनी शोभायात्रा सजल्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : नऊवारी साडी... नाकात नथ... डोक्यावर भरजरी फेटा, असे मराठमोळे वातावरण... त्याला झांज-लेझीम पथकांची साथ अशा मंगलमय वातावरणात डोंबिवलीत बुधवारी नववर्ष स्वागतयात्रा निघाली. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली. केवळ उपस्थितीच नव्हे, तर स्वागतयात्रेत पायी सहभागी होत त्यांनी मार्गक्रमण केल्याने उपस्थितांची मने त्यांनी जिंकली. मुख्यमंत्री शिंदे हेच स्वागतयात्रेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. अनेक सिने कलाकारांनीदेखील शोभायात्रेत सहभाग घेत नववर्षाचे स्वागत केले. या वेळी ‘सैराट’फेम आकाश ठोसर याने ढोलवर ठेका धरताच तरुणाईने त्याला डोक्यावर घेत प्रचंड प्रतिसाद दिला. ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते.
श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. बुधवारी पहाटे श्री गणेश मंदिरात आरती झाल्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. पश्चिमेतील भागशाळा मैदान येथे पालखीचे पूजन झाल्यानंतर स्वागतयात्रेस सुरुवात झाली. या यात्रेत शहरातील विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. डोंबिवली रनर्स, सायकल क्लब, क्षितिज, भरारी संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ यांसारख्या विविध संस्था यात सहभागी झाल्या होत्या. मराठमोळा पेहराव परिधान करत बुलेटवर, घोड्यांवर डोंबिवलीकर स्वार झाले होते. सायकल क्लब, रनर्स यांनी शोभायात्रेत सहभागी होत आरोग्याविषयी जनजागृती केली. पर्यावरण दक्षता मंच, ऊर्जा फाऊंडेशन, हिरकणी यांसारख्या संस्थांनीही पर्यावरणपूरक अशी जनजागृती केली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना अधोरेखित करणारा चित्ररथ या वेळी सहभागी झाला होता. पर्यावरण रक्षण, मृदासंवर्धन, जल अभियान यांसारख्या विषयांवर आधारित चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छताविषयक जनजागृती पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
-----------------------------------
मुख्यमंत्री पालखीचे भोई
विविध संस्थांकडून शहरातील चौकाचौकात मंच उभारण्यात आले होते. या मंचाकडून पालखीचे स्वागत करण्यात येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वेतील चार रस्ता येथून शोभायात्रेत सहभाग घेतला. पायी चालत त्यांनी पालखीतील गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखीला खांदा देत ते पालखीचे भोई झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच उत्साह संचारला होता. मुख्यमंत्री शिंदे यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सर्वांची एकच धडपड सुरू झाली. या वेळी गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले. शिंदे यांनीदेखील कोणाचे मन न दुखावता अनेकांसोबत फोटो काढले. त्यानंतर श्री गणेश मंदिरात जाऊन त्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेत डोंबिवलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
-------------------------
स्वागतयात्रेत पालिका निवडणुकीचे पडघम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंच उभारण्यात आला होता. या मंचाजवळ मुख्यमंत्री शिंदे आले; मात्र, ठाकरे गटाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नमस्कार करत पुढे जाणे पसंत केले. मनसेच्या कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती लावली. या वेळी आमदार राजू पाटील यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनीदेखील मनसे कार्यालयास भेट दिली. शिवसेना, भाजप, मनसेचे मनोमीलन झाले असून, येत्या पालिका निवडणुकांत युती दिसून येईल, अशा चर्चांना उधाण आले होते.
--------------------------
ढोल-ताशे पथक...
दरवर्षी प्रमाणे ढोल-ताशा पथकाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या वेळी जवळपास १० ते १२ पथके यामध्ये सहभागी झाली होती. चौकाचौकात ढोल-ताशा पथकांनी उभे राहून वादन केले. हे वादन ऐकण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर फडके रोडवरदेखील पथक प्रमुखांनी वादन करत सर्वांची मने जिंकली. ढोल-ताशाच्या गजरात तरुणाईचे पाय आपसूकच थिरकत होते.
---------------
गणेशमूर्तीचे आकर्षण
स्वागतयात्रेत गणेश मूर्तिकारांनी भव्य अशा गणेश मूर्तीदेखील या यात्रेत सहभागी केल्या होत्या. श्री गणेशाची या भव्य-दिव्य मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
-------------------------
फडके रोडवर आकर्षक रोषणाई
तरुणाईचा उत्साह यंदाच्या स्वागतयात्रेत दिसून आला. फडके रोडसह सावरकर रोड, केळकर रोड या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान करत तरुणांनी गर्दी केली होती. फडके रोडवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. तसेच शोभेच्या वस्तूंनी हा रस्ता सजविण्यात आला होता. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
आजोबांनी चालवली लाठी-काठी...
शोभायात्रेत लाठी-काठीचे खेळही खेळण्यात आले. या वेळी एका ७५ वर्षीय आजोबांनी अत्यंत सराईतपणे चालवलेली लाठी-काठी पाहून साऱ्यांच्याच नजरा त्याकडे खिळल्या होत्या.
रांगोळ्यांच्या पायघड्या
मंगळवारी सकाळी पाऊस पडल्याने रांगोळ्यांचे काय होणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आज संपूर्ण आकाश निरभ्र असल्याने संस्कार भारतीच्या उमेश पांचाळ यांनी फडके रोडसारख्या अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या.
सिनेकलाकारांची उपस्थिती
केदार शिंदे, सना शिंदे, अंकुश चौधरी, आकाश ठोसर, सायली पाटील, मयुरी वाघ, राज हंचन्नाळे, शिवाली परब यांसह हास्यजत्रेमधील इतर कलाकार सहभागी झाले होते.