
केडीएमसीचा अर्थसंकल्प आज सादर होणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : विलंब झालेला कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर होणार आहे. महापालिकेचा परिवहन उपक्रम व आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २३ मार्चला दुपारी १२ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे सादर करतील.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वाढलेला खर्च, तांत्रिक बिघाडामुळे अनेक महिने बंद अवस्थेत असलेले संगणकीकरण, पाणी बिल वाटपास झालेला उशीर अशा अनेक कारणांमुळे पालिकेची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. शहरात केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून अनेक विकासकामे सुरू आहेत. ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही. सरकारकडून पालिकेस किती निधी उपलब्ध झाला आहे. यातून किती व कोणती कामे मार्गी लावण्याकडे प्रशासन भर देणार आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. करवाढ, नवीन शुल्क किंवा शुल्कवाढ करणार की अर्थसंकल्प तुटीचा असणार, की नेहमीच्या प्रथेप्रमाणे शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.