
वर्तक महाविद्यालयात एनएसएस मूल्यमापन सत्र
विरार, ता. २२ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये पालघर जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) मूल्यमापन सत्र नुकतेच पार पडले. या सत्रामध्ये पालघर जिल्ह्यातील २४ महाविद्यालयांचे ३० रासेयो कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा समन्वयक प्रा. दीपा दळवी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे पालघर जिल्ह्यात वर्षभर राबविलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा या सत्रामध्ये सादर केला. तसेच आगामी वर्षात कोणते नवे कल्पक, समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली. मुंबई विद्यापीठाचे रासेयो विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. सुशील शिंदे व मुंबई विद्यापीठ रासेयो कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे व उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. वर्तक महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आदिती यादव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक केले व प्रा. डॉ. शत्रुघ्न फड यांनी आभार व्यक्त केले. या मूल्यमापन सत्रासाठी पालघर जिल्हा समन्वयक प्रा. दीपा दळवी, विभागीय समन्वयक प्रा. कोमल पाटील तसेच वर्तक महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. दीपा कत्रे व डॉ. हिरानंद खंबायत उपस्थित होते.