
पदपथावरील विजेचा खांब कोसळला
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : नेरूळमधील वंडर्स पार्कजवळ सेक्टर १९ ए येथे नव्याने बसवण्यात आलेला विजेचा खांब निखळून रस्त्यावर पडला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, विद्युत खांब कोसळण्याची नेरूळमधील ही दुसरी घटना असल्याने नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
नेरूळ, सेक्टर १६ येथे दोन महिन्यांपूर्वी नव्याने बसवलेला विद्युतखांब निखळून रस्त्यावर पडला होता. याच घटनेची पुनरावृत्ती २२ मार्च रोजी नेरूळ, सेक्टर १९ मधील वंडर्स पार्कजवळ झाली आहे. या घटनेत पदपथावरील विद्युत खांब जमिनीपासून निखळून पडला आहे; पण या दुर्घटनेच्या वेळी जवळ कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे. त्यामुळे मनपाच्या विद्युत विभागाचा करोडो रुपयांचा ठेका मिळवणाऱ्या संबंधित ठेकेदारांच्या कामांच्या चौकशीची मागणी होत आहे.
------------------------------------
नेरूळ, सेक्टर १६ मधील नादुरुस्त विद्युत खांब तातडीने दुरुस्त करण्यात येईल. तसेच नेरूळमधील वंडर्स पार्कजवळील खांबाचे खिळे काढल्याने ही घटना घडल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- संतोष मोडस्कर, उपअभियंता, नवी मुंबई महापालिका