
वाड्यात ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत
वाडा, ता. २२ (बातमीदार) : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा वाडा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरात नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व ढोलताशांच्या गजरात या शोभायात्रेत पारंपरिक पोशाख परिधान करून आबालवृद्ध सहभागी झाले होते. घरोघरी गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. नववर्ष स्वागत समिती वाडा शहराच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेची सुरुवात श्रीराम मंदिर येथून करण्यात आली. पुढे वाणी आळी, भानुशाली आळी, बाजारपेठ, पाटील आळी, बस स्टॅंड, विठ्ठल मंदिर, आगर आळी, गावदेवी मंदिर व पुन्हा श्रीराम मंदिर येथे येवून गुढी उभारून या शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
पालघरमध्ये ‘सूर पहाटेचे’ कार्यक्रमाचा जल्लोष
पालघर, ता. २२ (बातमीदार) : मराठी नववर्षाचे स्वागत पालघरमध्ये जल्लोषात करण्यात आले. ‘सूर पहाटेचे संगीत कार्यक्रम व ढोल ताशाच्या सुरात शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी मराठी संस्कृतीचे दर्शन, तारपा नृत्य, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेसह शेकडो नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. नववर्ष व गुढीपाडवा निमित्ताने पालघरमध्ये बुधवारी पहाटे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पालघरमधील लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरात ‘सूर पहाटेचे" हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायिका प्रिया दांडेकर, नम्रता घोडके, रूपक आचार्य यांनी व त्याला साथ देणारे तबलावादक पंकज आचार्य यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संगीत कार्यक्रमानंतर नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांच्या हस्ते गुढी पूजनकरण्यात आले.