
फुकट्या जाहिरातबाजांची चलती
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबईत सध्या फुकट्या फलकबाजीला ऊत आला आहे. पालिका क्षेत्रातील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर व तुर्भे भागांत मोठ्या प्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात येत असून विनापरवानगी फलकबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश असूनही सर्रासपणे प्रकार सुरूच आहेत.
स्वच्छ भारत अभियानासाठी शहर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे; मात्र बेकायदा जाहिरातींमुळे या प्रयत्नांमध्ये खोडा येत आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात विविध पक्षांचे शुभेच्छा देणारे बेकायदा फलक झळकत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डी-मार्ट चौकात, ऐरोली स्थानक परिसरात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. त्यात राजकीय सभा, वाढदिवस, मेळावे तसेच सणवारानिमित्त शुभेच्छा देणारे राजकीय नेते आघाडीवर आहेत. त्यामुळे पालिकेचे अधिकारी तसेच अतिक्रमणविरोधी पथक या फलकबाजीवर कारवाई करताना हात आखडता घेत आहेत. याबाबत कोपरखैरणे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.