बोईसरमध्ये बाजार कर ठेक्यात अनियमितता

बोईसरमध्ये बाजार कर ठेक्यात अनियमितता

मनोर, ता. २२ (बातमीदार) : बोईसर ग्रामपंचायतीने नवीन आर्थिक वर्षासाठी दिलेल्या बाजार करवसुलीच्या ठेक्यात नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आल्याने बाजार करवसुलीचा ठेका वादात सापडला आहे. चालू वर्षाचा बाजार करवसुलीचा ठेका ठेकेदार २४ लाख ३८ हजारांच्या रकमेत देण्यात आला होता; पण यात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांसह काही ठेकेदारांनी केला आहे.
सोमवारी बाजार करवसुली ठेका देण्याची प्रक्रिया सरपंच दिलीप धोडी यांच्यासह मोजक्या संख्येने उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांना संपात सहभागी असलेले ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे उपस्थित नसताना ठेक्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोयीच्या ठेकेदाराला ठेका देण्यासाठी अटी शर्तींचे उल्लंघन करून लिलावात भाग घेतलेल्या अन्य ठेकेदारांना बाजार करवसुली लिलावाच्या प्रक्रियेत डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य दशरथ सुतार आणि उषा चंद्रकांत जाधव यांच्यासह राऊत इंटरप्रायजेसचे अंकुर राऊळ आणि इन्फींनीटी इंजिनियरिंगचे महेश धोडी यांनी लिलाव प्रक्रियेवर हरकत घेत बाजार कर वसुलीचा ठेका रद्द करून नव्याने लिलाव प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील फेरीवाले, खाद्यपदार्थ, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांकडून बाजार करापोटी वसुली केली जाते. कोरोनाकाळात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्‍यांनी बाजार करवसुली करून वर्षाला बाजार कराच्या रूपाने जवळपास ३६ लाखांचा महसूल ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा केला होता. त्यानंतर २०२१-२२ आणि २०२२-२३ च्या दोन वर्षांसाठी एकच लिलाव प्रक्रिया राबवून एका वर्षासाठी २१ लाख ११ हजार १११ रूपयांच्या मोबदल्यात बाजार करवसुलीचा ठेका देण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य राजेश करवीर यांनी चौकशीची मागणी केली होती; तर आता पुन्हा ठेकेदाराची नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांसह काही ठेकेदारांनी केला आहे.
....
अवघी तीन दिवसांची मुदत
बाजार करवसुलीच्या लिलावाच्या प्रक्रियेसाठी गुरुवारी (ता. १७) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली; परंतु स्पर्धक ठेकेदारांना लिलावात भाग घेता येऊ नये, यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करता येऊ नये, यासाठी तीन दिवसांमध्ये शनिवार-रविवारसारखे साप्ताहिक सुट्टीचे दिवस निवडण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
....
बोईसर ग्रामपंचायतीच्या बाजार करवसुली लिलाव प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चौकशी करून लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास ठेका रद्द करून नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्याचे दिले जातील.
- चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com