अंगण सारवून आनंदाने उभारली गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगण सारवून आनंदाने उभारली गुढी
अंगण सारवून आनंदाने उभारली गुढी

अंगण सारवून आनंदाने उभारली गुढी

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) : पालघर ग्रामीण भागात अद्यापही रुढी, परंपरा जपल्या जात आहेत. नववर्षाचे स्वागत करतानादेखील हे पाहवयास मिळाले. प्रत्येकाच्या घरासमोरील अंगण सारवून तेथे सुबक रांगोळी काढून पूजन करत गुढी उभारण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल्लोषात मराठी नववर्ष साजरे करण्यात आले. विक्रमगड, डहाणू, मोखाडा, जव्हार, पालघर, वसई, वाडा, तलासरी भागात सामाजिक संस्था, विविध पक्षीय मंडळींनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. रथयात्रेत श्रीराम, हनुमान वेशभूषा करून लहान मुले तरुण सहभागी झाले होते; तर लेझीम पथकाचा आवाज निनादत होता. ढोल-ताशा पथकांमध्ये तरुणी, महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. शहरी भागातील गृहसंकुलात पूजेचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; तर ग्रामीण भागात गुढी उभारताना गावातील मंडळींनी घर स्वच्छ करून, अंगणात विविध रंगी रांगोळी काढली, फुलांचा सडा तसेच गुढी उभारण्यात आली.
--------------------
सामाजिक जाणिवेची गुढी
गुढीपाडव्यानिमित्त शबरी समितीच्या वतीने राज्यभरात ७० ते ७५ कार्यकर्त्यांनी ‘नव विचारांची, आनंदाची गुढी’ उभारली. या उपक्रमात या कार्यकर्त्यांनी गरजू, विकलांग यांचे घरे सारवून स्वच्छ करून दिली. तसेच त्यांच्या घरी गोडधोड जेवण करून विकलांग नागरिकांना भरवले. काहींच्या घरात प्रथमच गुढी उभारली गेली. यानिमित्ताने सामाजिक जाणिवांचा एक नवा पायंडा निर्माण करण्यात आला. शबरी संस्थेने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ठिकठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
-----------------
जीवदानी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू
विरार (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध जीवदानी मंदिरात आजपासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त पहाटे देवीला महाअभिषेक करण्यात आल्यावर गडावर गुढी उभारण्यात आली. जीवदानी देवी संस्थांतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. २६ तारखेला श्री लक्ष्मी पंचमी हवन होणार आहे; तर २९ तारखेला सकाळी गणेशपूजन, कलशपूजन, श्री सरस्वती, श्री दुर्गा नवग्रह, श्री चंडीपाठ आणि हवनपूजा होणार आहे; तर ३० तारखेला श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
...............
वसई : पालघर ग्रामीण भागात नागरिकांनी नववर्षाचे आनंद स्वागत केले.