चरकोपमध्ये देखाव्यांनी फेडले पारणे

चरकोपमध्ये देखाव्यांनी फेडले पारणे

कांदिवली, ता.२२ (बातमीदार) ः चारकोपमध्ये नववर्षानिमित्त विविध संस्थांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.२२) सकाळी ८ वाजता याला प्रारंभ झाला. चारकोप मार्केट ते स्वामी समर्थ मठापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यात तुळजाभवानी, विठ्ठल रघुमाई, तुकाराम महाराज यांच्या भव्य प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. नाक्यानाक्यावर रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती. फुलांची पखरण केली गेली होती. तरुण मुलांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके करून दाखवली. यात वारकरी तसेच महिलांचे लेझिम पथक सामील झाले होते. दुपारी १२ वाजता यात्रेचा समारोप करण्यात आला.

सकाळीच महिलांनी पारंपरिक वेशात चारकोप नाका ते स्वामी समर्थ मठ मार्गावर रंगबेरंगी रांगोळ्या साकारल्या. न भुतो न भविष्यती अशी गर्दी चारकोप नाक्यावर झाली होती. गुढी उभारून मनोभावे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम दुचाकीवर महिला व पुरूष , ढोल ताशा पथक, तुळजाभवानीची भव्य प्रतिमा असलेला ट्रक, हातात झेंडे घेऊन फेटा घातलेल्या महिला, विठ्ठलाची प्रतिमा असलेला ट्रक असे एका मागून एक सामील झाले होते. त्याचप्रमाणे सह्याद्री नगर वारकरी संप्रदाय, मल्लखांब प्रात्यक्षिके, महिलांचे लेझीम पथक, जीवन विद्या मिशनची दिंडी, विविध वेशभुषेतील बाल कलाकार, बाल संस्कार व लोकरंग पथक, संत रोहिदास समाज दिंडी, ब्रह्मकुमारी संदेश,आर्ट ऑफ लिव्हिंग, हार्ट फुलनेस, सिंधुदुर्ग रथ, ज्येष्ठ नागरिक व स्वानंद योग संघ असे सर्व सहभागी झाले होते.

संतांच्या वेशभुषेतील नागरिक, बालक व युवक, युवती शोभा यात्रेत सहभागी झाल्याने संपूर्ण चारकोप नगरीत उत्साह ओसंडून वाहत होता. नागरिक, आवडीने मोबाईल आणि कॅमेऱ्याने शोभायात्रा टिपत होते. ढोल ताशा पथक, महिला व तरूणांची लेझीम पथके, १०० हून अधिक फेटेधारी दुचाकीस्वार आणि चौकात महिलांच्या फुगड्या व मल्लखांब प्रात्यक्षिके पाहायला ठिकठिकाणी गर्दी होत होती. तुळजाभवानी आणि विठ्ठलाचा देखाव्याला भाविक हात जोडून पाया पडत होते. चारकोपमध्ये शोभा यात्रेत पंढरी अवतरल्याचा भास प्रत्येक नागरिकाने अनुभवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com