पालघरवासीयांवर करवाढ नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरवासीयांवर करवाढ नाही
पालघरवासीयांवर करवाढ नाही

पालघरवासीयांवर करवाढ नाही

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार) : कोणतीही करवाढ न करता पालघर नगर परिषदेने ९० कोटी ५० लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यात पुढील वर्षात शहरातील मूलभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासोबत पाच मोठ्या कामांकरिता अर्थसंकल्पीय मंजुरी देण्यात आली आहे.
पालघर नगर परिषदेची येत्या २०२४ मध्ये निवडणूक आहे. एकच वर्ष असल्याने निवडणुकीकडे लक्ष ठेवून अर्थसंकल्पात नवीन कामे मंजूर करण्यात आली आहे. अर्थसंकल्प स्थायी समितीने सुचविलेल्या शिफारशींसह सर्वसाधारण सभेत मांडला. या अर्थसंकल्पाला नगरपरिषद सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. मागील वर्षाच्या ८२.१९ कोटी रुपयांच्या आरंभी शिलकीसह नगर परिषदेकडे ३३ कोटी १० लाख रुपये जमा होणे अपेक्षित असून भांडवली जमा ५८.९३ कोटी रुपयासह नगर परिषदेकडे १७४ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. तसेच नगरपरिषदेचा ४२.९५ कोटी रुपयांचा खर्च ३६.२३ कोटी रुपयांचा भांडवली खर्च असा एकूण ७९.१८ रुपयांचा खर्च होणार आहे.
या अर्थसंकल्पात विविध नगरसेवकामार्फत सुचवण्यात येणाऱ्या कामांसाठी दीड कोटी रुपये, शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी ८० लाख रुपये, दिवाबत्ती देखभालीसाठी ४० लाख, मासळी मार्केट साठी दोन कोटी, बगीचा सुशोभीकरणासाठी एक कोटी, समाज मंदिर उभारण्यासाठी दीड कोटी रुपये, दलित वस्तीसाठी व मालमत्ता सर्वेक्षणासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी, व्यायामशाळा साहित्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
....
महिला बालकल्याणासाठी ४५ लाख
अपंग लाभार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची योजना राबवली असून विद्यमान वर्षात ३१९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्पात अपंग कल्याण- २५ लाख, महिला बालकल्याण योजना- ४५ लाख, तसेच मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी- ४० लाख खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अल्लाळी येथील क्रीडांगण विकसित करणे, गणेश कुंडांचे सुशोभित करणे, शहरातील स्मशानभूमी विकसित करणे, डम्पिंग ग्राऊंडला कम्पाऊंड उभारणे, तसेच रस्ता अनुदानातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेमार्फत विविध प्रभागातील रस्ते विकसित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.