स्वागतयात्रांचा आनंदोत्सव!

स्वागतयात्रांचा आनंदोत्सव!

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कोविड संसर्गानंतर सावरलेल्या मुंबईकरांनी तीन वर्षांनंतर यंदाचा गुढीपाडवा बुधवारी जल्लोषात साजरा केला. पारंपरिक पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करताना मुंबईतील मराठमोळ्या वस्त्या आनंदाने ओसंडून वाहत होत्या. ठिकठिकाणी निघालेल्या स्वागतयात्रा, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचा ताल, विविध सामाजिक विषयांवर आधारित चित्ररथ, बालशिवाजी आणि रणरागिणी बनून आलेली बच्चेकंपनी, थोरा-मोठ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, नथीचा नखरा आणि नऊवारीचा थाट मिरवत बाईकवर स्वार झालेल्या महिला अशा अपूर्व उत्साहात गुढीपाडव्याचा सोहळा साजरा झाला. गिरगावच्या स्वागतयात्रेत झालेली गर्दी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.
गिरगाव, दादर, लालबाग, परळ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव व बोरिवलीबरोबरच वरळी, प्रभादेवी, घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त शोभायात्रा काढण्यात आल्या. मोठ्या संख्येने मुंबईकर त्यात सहभागी झाले होते. गिरगावच्या शोभायात्रेला फडके गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. महिला आणि चिमुकल्यांचा उत्साही सहभाग शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. सुंदर साडी, पारंपरिक दागिने आणि नाकात नथ घालून बुलेटवर स्वार झालेल्या महिला अनेकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

गिरगावप्रमाणेच मुंबईच्या विविध उपनगरांत स्वागतयात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. ज्येष्ठ महिलांबरोबरच तरुण-तरुणी नटून-थटून आणि डोळ्यांवर गॉगल चढवून यात्रेत सहभागी झाल्या होत्या. एक वेगळाच रुबाब आज त्यांच्या देहबोलीत जाणवत होता. फेट्याची क्रेझ मुलांबरोबरच मुलींमध्येही पाहायला मिळाली.

मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांची भुरळ
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही नव्या जल्लोषात काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शोभायात्रेत मुला-मुलींनी पारंपरिक साहसी खेळांची झलक दाखवली. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या जवळपास ४५ लहान मुला-मुलींनी आपल्या प्रशिक्षकांसह मल्लखांबाची प्रात्यक्षिके करून दाखवली. दोरीचा मल्लखांब करून दाखवणाऱ्या १२ ते १३ वर्षांच्या मुलींचे धाडस डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शिवराम युवा प्रतिष्ठानच्या वतीने २० ते २२ वयोगटातील मुला-मुलींनी दांडपट्टा खेळाची प्रात्यक्षिके दाखवली. त्यासह ढोल-ताशांच्या तालात रांगोळीची जुगलबंदीही अनुभवायला मिळाली.

चित्ररथांचा देखाव्यांसह नमनाची साथ
सर्वच ठिकाण निघालेल्या शोभायात्रांत अनेक चित्ररथ पाहायला मिळाले. एकवीरा देवीची प्रतिमा, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, तेजस यान, ब्रह्मोस क्षेपणास्त्र इत्यादींचा चित्ररथात समावेश होता. गिरगावमध्ये चाणक्यांची २२ फुटांची प्रतिमा पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. कोकणातील पारंपरिक लोककला म्हणजेच नमन आणि दशावतार. त्याचीही झलक पाहायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातील कळझोंडी गावातील नाट्य नमन मंडळाने नमन कला जपण्याचा वसा घेतला आहे. गेल्या ६० हून अधिक काळ लोटलेल्या नमन कलेला नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कायम अशा रीतीने गिरगावातील शोभायात्रेत सहभागी होतो, असे नाट्य नमन मंडळाचे सदस्य नीलेश जोगळे यांनी सांगितले.

कलाकारांचीही साथ
गिरगावमधील शोभायात्रेत छट्या पडद्यावरील कलाकारही सहभागी झाले होते. मिलिंद गवळी, अभिजीत खांडकेकर, रूपाली भोसले आणि प्रिया मराठे यांनी तरुणांचा उत्साह वाढवला. गुढीपाडवा मराठी सण आहे. आपली संस्कृती आपण जोपासायला हवी. पुढील पिढीसाठी ती राखून ठेवली पाहिजे. आपल्या माणसांना जोडण्यासाठी असे सण महत्त्वाचे असतात, अशी भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.

ढोल-ताशांचा नादच वेगळा
बाजी, गजर, मोरया आणि गिरगाव ध्वजपथक अशा चार महत्त्वाच्या ढोल-ताशा पथकांनी सकाळपासूनच गिरगावचा परिसर दणदणून टाकला होता. अनेक तरुण-तरुणींसह सहा-सात वर्षांची लहान मुलेही मोठ्या झोकात ढोल-ताशा वाजवत होती. त्यांचा उत्साह पाहून अनेकांनी त्याच्या तालावर थिरकण्याची संधी सोडली नाही. तरुणांबरोबरच महिला लेझीम पथकांनीही शोभायात्रेची शोन वाढवली.

चौथीतील मुलगी घोड्यावर स्वार
परळची रहिवासी असलेली चौथीतील इरा भिडे घोड्यावर बिनधास्त स्वार झाली होती. कोणत्याही सरावाशिवाय तिने घोड्यावर बसण्याचे धाडस केले. छान नटून-थटून अनेक उत्सवांमध्ये सहभागी व्हायला मला खूप आवडते, असे ती म्हणाली. पाच वर्षांपासून शिरीन शिंदेही शोभायात्रेत सहभागी होतेय. बाईकवर पेशवाई पेहारावात आलेल्या शिरीनने पाडव्याची तयारी १५ दिवस आधीपासूनच सुरू केली होती.

फिटनेससाठी सायकल रॅली
गिरगावच्या यात्रेत अंधेरीहून आलेल्या सायक्लो फोनॅटिक्स ग्रुपचे ३० सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी रॅलीदरम्यान फिट राहण्याचा संदेश दिला. फिटनेस आणि मनोरंजन अशा मुख्य उद्दिष्टांसाठी ते स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. अंधेरी ते गिरगाव सायकल चालवत आपण इथपर्यंत आलो. सर्वांनी आनंदी आणि फिट राहायला हवे, असे ग्रुपच्या स्वाती नलावडे यांनी सांगितले.

डॉ. तेजस लोखंडेंचा आरोग्यदायी संदेश
मूळचे गिरगावकर असलेले डॉ. तेजस लोखंडे दरवर्षी शोभायात्रेदरम्यान भव्य रांगोळी काढतात. यंदा त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जुगलबंदीत रांगोळी काढली. समर्थ भारत... विश्वगुरू भारत, अशी संकल्पना त्यांनी रांगोळीतून मांडली. प्राचीन भारतात लागलेले आधुनिक शोध अनेक वर्षांपासून आपल्याकडे आहेत. कित्येक हजारो वर्षांपासून आपल्याकडे वारकरी संपद्राय आहे. आता परदेशातही तेवढ्याच सक्रियतेने भक्ती केली जाते, असे लोखंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com