
ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा बळी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे शहरात बुधवारी दिवसभरात तब्बल ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येने जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा हा ३०६ वर पोहचला आहे. त्यामधील २०६ सक्रिय रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका हद्दीत आहेत. त्यातच आठवड्याभरात पालिता हद्दीतील हा कोरोनाचा तिसरा बळी आहे. एकीकडे गुढीपाडवा मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना, दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यातच बुधवारी ठाणे जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची ७१ वर गेली आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५१ रुग्ण असून एकाचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीत ५, नवी मुंबई आणि भिवंडी येथे प्रत्येकी ४, ठाणे ग्रामीण -३ रुग्ण नोंदवले गेले आहेत. तसेच उल्हासनगर, मिरा भाईंदर, कुळगाव बदलापूर या ठिकाणी एक ही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.