जंगली झाडांची फुले, बियांपासून आदिवासींना रोजगार

जंगली झाडांची फुले, बियांपासून आदिवासींना रोजगार

संदीप साळवे : सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २३ : भौगोलिकदृष्ट्या जव्हार तालुका हा दुर्गम असला, तरी या भागातील जंगलात अनेक औषधी वनस्पती, झाडांसह वनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ही वनसंपत्ती गोळा करून या भागातील गोरगरिबांना आर्थिक आधार मिळत आहे. जंगलात सापडणारी जंगली झाडांची फुले, बियांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार उपलब्ध होत आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलसंपत्ती आहे. या जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू आणि वाडा हे तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील जंगल भागात राहणारी शेकडो आदिवासी कुटुंबे ही जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले आणि बियाणे विकून आपला संसारगाडा चालवित असतात. जंगलातील काही झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले व बिया या येथील आदिवासींना वरदान ठरत असून या जंगली रानमेव्याची विक्री करून एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषतः शहरात व्यापाऱ्यांकडून वस्तुविनिमय पद्धतीने या रानमेव्याची खरेदी होत असल्याने या माध्यमातून आदिवासींना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत.
जंगलातील साग, निलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सीताफळ, डिंक, सागरगोटे, रिठा, बावा आदी जंगली झाडांच्या बिया तसेच सुकविलेली मोहफुले व तेलबिया यांची विक्री करून रोजगार मिळवित आहेत.
...
शहरातून विशेष मागणी
जंगली झाडे व अन्य वनौषधी वनस्पती यांच्या बियांना शहरी भागात खूप मागणी आहे. तसेच विविध जंगली झाडांच्या बियाण्यांची रोपवाटिकेचा व्यवसाय करणाऱ्यांकडून विशेष खरेदी केली जाते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात ही जंगली झाडांची बियाणे, फुले खरेदी करण्यासाठी शहरातून खास व्यापारी येत असतात.
...
आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जंगली वनस्पतींचे बियाणे खरेदी केले जाते. या बदल्यात व्यापारी मिरची पावडर, डाळी, कांदा, बटाटा तसेच संसारोपयोगी भांडी देत असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होत नाही; पण वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिली जाते.
- बायजी दिघा, रानमेवा संकलक
...
जंगली वनस्पतींची काही फुले, बिया या नाशवंत असल्याने त्यांची योग्य साठवण केली, तरच फायदेशीर ठरते. शिवाय येथील आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास आदिवासींना अधिक दर मिळेल व त्यापासून एक शाश्वत रोजगार उपलब्ध होईल.
- गुलाब राडे, वन अभ्यासक, जव्हार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com