श्रेयवादासाठी एकाच रस्‍त्‍याचे दोनदा भूमिपूजन

श्रेयवादासाठी एकाच रस्‍त्‍याचे दोनदा भूमिपूजन

अलिबाग, ता. २३ (बातमीदार) ः अलिबाग-रोहा-माणगाव साईपर्यंत असलेल्या ८२ किलोमीटर रस्त्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती, त्‍यासाठी एजन्सीही नियुक्‍त केली होती, मात्र कामाला सुरुवात झाली नव्हती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बुधवारी अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र रस्‍त्‍याच्या कामासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला, श्रेय मात्र भाजपकडून घेण्यात आल्‍याचा आरोप करीत गुरुवारी शिवसेनेच्या नेत्‍यांनी पुन्हा त्‍याच कामाचा भूमिपूजन केल्‍याने परिसरात राजकीय खळबळ उडाली आहे. 

काम रखडल्‍याने खड्डेमय मार्गातून प्रवास करताना नागरिक तसेच चालकांना पुरती कसरत करावी लागायची. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी रस्त्‍याची समस्‍या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडली. त्‍यांनी याप्रकरणी दखल घेत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. 

सतत खड्ड्यांतून वाहन चालवून अनेक चालकांना कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीच्या व्याधी जडल्‍या आहेत. अनेक वर्षांपासून प्रवासी नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना, विद्यार्थी, वयोवृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला, दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दिलीप भोईर यांनी नूतनीकरणाचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी १७ मार्च रोजी केली होती. या मागणीची दखल घेत व प्रवाशांच्या समस्यांचा विचार करून बांधकाममंत्री चव्हाण यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यानुसार बुधवारपासून कामाला सुरू झाली.

रस्‍त्‍याचे काम २०० कोटींचा खर्च अपेक्षित

अलिबाग-रोहामार्गे माणगाव-साई रस्त्याचा प्रकल्प २०० कोटीचा असून ८२ किलोमीटरचे रस्‍त्‍यांचे काम केले जाणार आहे. यात डांबरीकरण, मजबुतीकरण, रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्याचे काम केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात रुंदीकरण व वायरिंगची कामे केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

खड्ड्यांमुळे अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने रस्त्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या. 

- दिलीप भोईर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष, दक्षिण विभाग

आमदारांच्या पाठपुराव्याला यश

स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाल्यानंतर अलिबाग बेलकडे वावे रोहा या मुख्य रस्त्याचे काम नवीन ठेकेदरामार्फत सुरू करण्यात येत आहे. मात्र, कालपरवा मित्रपक्षात प्रवेश करणारी कामाचे श्रेय घेत आहेत. या कामाशी काहीही संबंध नसताना स्थानिक आमदारांना डावलून भाजपचे दक्षिण उपजिल्हाप्रमुख दिलीप भोईर यांनी बुधवारी रस्‍त्‍याच्या कामाचे भूमिपूजन केले, हे खपवून घेणार नाही असा इशारा शिंदेगटाच्या  नेत्या मानसी दळवी यांनी दिला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी यांच्या हस्ते याच रस्त्याचे गुरुवारी पुन्हा भूमिपूजन करण्यात आले.

महेंद्र दळवी आमदार झाल्यानंतर त्यांनी अलिबाग-रोहा रस्त्यासाठी १७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तीन वर्षांपूर्वी अगरवाल या ठेकेदारास पावणे दोनशे कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी कामाला सुरुवात केली होती. परंतु काही कारणास्‍तव काम रखडले. आता काम सुरू झाले असून ते  निर्धारित वेळेत आणि चांगल्या दर्जाचे होईल.

- मानसी दळवी, शिवसेना नेत्‍या, शिंदेगट

महेंद्र दळवी यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे. या कामाचे श्रेय अनेक राजकीय प्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्वत: निधी उपलब्ध करावा आणि मगच श्रेय घ्यावे. अलिबाग मुरूड मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत.
- राजाभाई केणी, शिवसेना जिल्हा प्रमुख, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com