पांढरा कांद्याने आर्थिक सुबत्ता

पांढरा कांद्याने आर्थिक सुबत्ता

महेंद्र दुसार, अलिबाग
जीआय मानांकन मिळाल्यानंतर अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तुलनेने उत्‍पादन कमी असल्‍याने यंदा किमतीतही ३० टक्के वाढ झाली आहे. दोन माळींच्या एका मणाला ८०० रुपये इतकी किंमत मिळू लागली आहे. पांढऱ्या कांद्याच्या लागवडीमुळे स्‍थानिक शेतकऱ्यांना आर्थिक उभारी मिळाली आहे.
औषधी गुणधर्म आणि विशिष्‍ट चवीसाठी अलिबागचा पांढरा कांदा प्रसिद्ध आहे. गतवर्षी या कांद्याला जीआय (भौगोलिक मानांकन) मिळाल्‍याने मागणी जवळपास ३० टक्क्‍यांनी वाढली आहे. इतर तालुक्यात तयार होणारा कांदा अलिबागच्या नावाने विकला जात असे. जीआय मानांकनामुळे यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे गतवर्षापर्यंत ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या दोन माळांची किंमत आता ८०० ते १००० रुपयांच्या घरात गेली आहे. लागवड खर्च भागवून शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळत असल्याने अनेक प्रयोगशील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करू लागले आहेत.
कांद्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भात पिकाची कापणी झाल्यानंतर लगेचच पांढऱ्या कांद्याची लागवड करता यावी, यासाठी नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, लागवडीचे तंत्र समजवण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून आतापासूनच मार्गदर्शन केले जात आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक वातावरणामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांद्याचा दर्जा अद्याप शाबूत आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर येथील शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

क्षेत्रवाढीसाठी सीडबॅंकची उभारणी
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा, वाडगाव यासारख्या गावांमध्ये फक्त २३० हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. बियाणाची कमतरतेमुळे लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाने सीडबॅंकेच्या माध्यमातून बियाणे जमवून नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर कृषी विभागाने पांढरा कांदा लागवडीचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
ठराविक भूभागात पांढरा कांदा तयार होत असल्याने उत्पादन खूपच कमी आहे, तर औषधी गुणधर्मामुळे मागणी जास्‍त असल्‍याने कांदा चढ्या दराने विकला जातो. मागील वर्षी ५० रुपये प्रतिकिलो दराने कांदा शेताच्या बांधावर विकला गेला. पर्यटकांकडून जास्त प्रमाणात पांढरा कांदा खरेदी केला जात असल्याने मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लकच राहत नाही. चांगला भाव मिळत असल्‍याने पांढऱ्या कांद्याच्या लागवडीकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळू लागले आहेत.

कमी जागेत चांगले पीक
कमीत कमी जागेत कमी खर्चात पांढऱ्या कांद्याचा दर्जेदार पीक घेता येतो. अलिबाग तालुक्यात अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना ही शेती फायद्याची ठरते. मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई जाणवू लागेपर्यंत हे पीक काढून झालेले असते. त्याचबरोबर स्थानिक बाजारातच ते विकता येते.

मणामध्ये मोजमाप
मध्यम आकाराचे वीस ते पंचवीस कांदे एकत्र करून त्यांच्या पातींच्या वेण्या विणल्या जातात. दोन वेण्या एकत्र बांधल्यावर एक माळ आणि दोन माळींचा एक मण अशा परिमाणात पांढऱ्या कांद्याचे मोजमाप पारंपरिक पद्धतीने केले जाते. आजही त्याच पद्धतीने त्याची विक्री केली जाते. नुकत्‍याच पडलेल्‍या अवकाळी पावसामुळे कांद्याची पात कुजली आहे, त्यामुळे त्यांच्या वेण्या विणता येत नसल्याने काही विक्रेत्यांनी सुटे कांदेही विकण्यास सुरुवात केली आहे.

बियाणाची उपलब्धता ही क्षेत्र वाढविण्यात मुख्य अडचण आहे.
यासाठी बियाणे देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. बियाण्यांबरोबरच लागवड, पाणी पुरवठ्यासाठी आत्मा योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले आहे. जीआय मानांकन जाहीर झाल्‍याने अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे चांगल्या प्रकारे ब्रॅंडिंग करता येणार आहे.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक

पांढरा कांद्याची लागवड आजही पारंपरिक पद्धतीने केली जाते. दहा वर्षापर्यंत या पिकाला सरकारकडून फारशी मदत मिळाली नाही. कांद्याचे औषधी गुण आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे त्याचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. जीआय मानांकनामुळे याची मार्केटिंग व्यवस्थित होऊ लागली असून पर्यटक अलिबागचा पांढरा कांदा आवर्जून खरेदी करतात.
- प्रभाकर नाईक, शेतकरी, तळवली-अलिबाग

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com