
फेरीवाल्यांचा पदपथांवर कब्जा
नेरूळ, ता. २३ (बातमीदार)ः हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचे विळखा पडला आहे; तर स्थानकाबाहेरदेखील भाजीवाल्यांनी पदपथांवर अतिक्रमण केले असल्याने प्रवाशांचा दैनंदिन प्रवास कटकटीचा झाला आहे.
हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर सिडकोच्या माध्यमातून अद्ययावत अशी रेल्वे स्थानके विकसित केलेले आहेत. मात्र या स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने सध्यस्थितीत स्थानकांना बकालपणा आला आहे. अशीच अवस्था नेरूळ स्थानकाची झाली आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाले वाढले आहेत. प्रवेशद्वारापासून ते फलटापर्यंतच्या जागांवर अतिक्रमण झाले असल्याने परिसराला भाजी मंडईचे स्वरूप आले आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी नेरूळ आणि कोपरखैरणे स्थानकाला भेट देत सेवा-सुविधांवर भर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशाला सुरक्षारक्षकांनीच केराची टोपली दाखवल्याने फेरीवाल्यांनी पदपथांवर कब्जा केला आहे.
-------------------------------
संध्याकाळच्या वेळी येथे फेरीवाले पदपथावरच व्यवसाय मांडतात. तसेच स्थानक परिसरात रिक्षावाल्यांचीही गर्दी असते. त्यामुळे कामावरून परतताना नेहमी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
- श्वेता मोरे, नागरिक
-------------------------
बेकायदा फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी प्रत्येक तासाला पालिकेचे पथक फिरत असते; परंतु पथक गेल्यानंतर फेरीवाले पुन्हा व्यवसाय मांडत आहेत.
- बाबासाहेब कराडे, अधीक्षक, अतिक्रमण विभाग, महापालिका