बहुगुणी नारळपाणी

बहुगुणी नारळपाणी

शुभांगी पाटील, तुर्भे
उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. या काळात शरीर डिहायड्रेट ठेवण्यासाठी फळांचा रस, शीतपेयांचा आधार घेतला जातो. सध्या शहाळ्यांची मागणी वाढली असून आरोग्‍यवर्धक नारळपाणी शरीरातील तापमान सामन्य ठेवते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यात कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल नसल्‍याने रक्‍तदाब, त्यामुळे ब्लडप्रेशर आणि हृदयविकारावरही ते फायदेशीर आहे. त्यामुळे गेल्‍या दीड वर्षात शहाळ्याच्या किमती २० ते २५ रुपयांवरून ६० रुपयांवर गेली आहे.
पोटासंबंधी आजार असो अथवा बद्धकोष्टता, नारळपाणी पिल्‍याने या समस्‍या दूर होतात. तसेच पचनशक्तीही वाढते. रक्तदाबावर नियंत्रणासाठी, वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. बहुगुणी नारळ पाण्याला सर्वांचीच पसंती मिळते. कोकण, सिंधुदुर्ग, केरळ आदी ठिकाणांहून शहाळ्‌यांची मोठ्‌या प्रमाणात आवक होते. प्रवास खर्च अधिक होत असल्‍याने दरात वाढ केल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना काळात थंड पेय बनविणाऱ्या व्यवसायावर गदा आली होती. कोरोना काळात नागरिक आरोग्याच्या दृष्टीने अधिक जागरूक झाल्याने अनेकांचा पौष्टिक खाणे व पिण्याकडे, व्यायाम, योग, प्राणायामच्या माध्यमातून शारीरिक स्‍वास्‍थ्‍यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्‍यामुळे हल्‍ली उन्हाळ्यात बाटलीबंद शीतपेयांपेक्षा मोसंबी ज्‍यूस, कोकम सरबत, लिंबूपाणी, नारळ पाणी, उसाचा रस आदी पिण्याला प्राधान्य मिळत असल्‍याचे दिसते.
सध्या वातावरण खराब झाल्याने सर्दी, ताप, खोकला व अंगदुखीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्‍ज्ञांकडून जास्त पाणी व ज्यूस, नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे.

गेल्‍या आठवड्यात एका दिवसांत तिन्ही ऋतूचा अनुभव आला. बदलत्‍या हवामानाचा आरोग्‍यावर परिणाम होत असून संसर्गजन्य आजार बळावले आहेत. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नारळ पाणी गुणकारी आहे. किमती वाढल्‍याने आठवड्‌यातून दोन अथवा तीनदा नारळी पाणी पिण्याला प्राधान्य देतो.
- अमोल रावराणे, नागरिक

किमत ४० ते ५५ रुपये
इंधन दरवाढ, प्रवास खर्चामुळे शहाळ्यांच्या किमती वाढल्‍या आहेत. मात्र सध्या संसर्गजन्य आजार वाढल्‍याने नारळपाणी पिण्याला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. आकारानुसार आणि दर्जानुसार ४० ते ५५ रुपयांपर्यंत एक शहाळे विकले जात असल्‍याचे एका विक्रेत्‍याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com