
‘नैना’विरोधात सिडकोवर धडक
नवीन पनवेल, ता. २३ (वार्ताहर)ः नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभावित क्षेत्र अर्थात नैनामुळे पनवेल परिसरातील २३ गावे प्रभावित होणार आहेत. त्यामुळे नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष संघर्ष समितीच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलन उभे केले जात आहे. याच अनुषंगाने गुरुवारी (ता. २३) पनवेल ते बेलापूरच्या सिडको भवनपर्यंत काढलेल्या वाहन रॅलीतून हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलकांमुळे नैनाविरोधातील रस्त्यावरील संघर्षही तीव्र झाल्याचे दिसून आले.
नैनाने पनवेलमधील २३ गावांमध्ये विकासाचे स्वप्न दाखवून विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यामुळे येथील जमिनींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नऊ वर्षांत नैना प्राधिकरणाच्या जाचक अटींमुळे या परिसरातील इमारत बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून शेकडो प्रकल्प ठप्प असल्याने स्थानिक विकासकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नैनाच्या विरोधात महाविकास आघाडी, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष संघर्ष समिती, ९५ गाव संघर्ष समिती आणि इतर सामाजिक संघटनांनी १२ फेब्रुवारीपासून गाव बंद आंदोलन सुरू केले होते. ४० ते ४५ दिवसांपासून गावागावांतील अंतर्गत व्यवहार बंद ठेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सिडकोला धडा शिकवण्यासाठी वाहन रॅली काढली होती.
---------------------------------------------------
आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा
‘सिडको हटाव आणि शेतकरी बचाव’, अशी भूमिका संतापलेल्या शेतकऱ्यांनी घेऊन गुरुवारी बेलापूर येथील सिडको भवनावर जवळपास दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या दुचाकी, चारचाकी, तीन आसनी रिक्षा घेऊन शेतकरी या आंदोलनात सामील झाले आहेत. या आंदोलनाला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा पाठिंबा आहे. तसेच ५ गाव संघर्ष समिती, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष संघर्ष समिती स्थापन करून सरकारविरोधात आंदोलन उभे केले.
----------------------------------------
पोलिसांचे चोख नियोजन
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिमंडळ दोनमधील सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंदोबस्तासाठी तैनात होते. या वेळी वाहतुकीचे नियोजन करून चोख बंदोबस्त लावून नियोजनबद्ध वाहन रॅली खांदेश्वरपासून बेलापूरपर्यंत पोहोचली. जवळपास दोनशेच्या आसपास तीनचाकी चारचाकी व पाचशे ते सहाशे मोटर सायकल मिळून दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.
----------------------------------
लाल बावट्याचे वादळ
सिडको महामंडळाच्या बेलापूर येथील सिडको भवन या इमारतीपर्यंत ही वाहन फेरी जाणार आहे. ‘नैना हटाव आणि शेतकरी बचाव’ अशा आशयाचे फलक तसेच काळे आणि लालबावट्याचे झेंडे घेऊन वाहनफेरीत आंदोलक एकत्र आले आहेत.
-----------------------------------------
आंदोलनामुळे वाहतुकीत बदल
पनवेलवरून येणाऱ्या वाहन रॅलीला नवी मुंबई पोलिसांनी सायन-पनवेल महामार्गावरील पुलाखालून बेलापूरमध्ये प्रवेश न देता उरणफाटा मार्गे नवी मुंबई आयुक्तालयाच्या चौकातून बेलापूर रायगड भवन येथे वाहतूक वळवण्यात आली होती. सिडको भवनकडे जाणारा सायन-पनवेल महामार्ग, पोलिस आयुक्तालय चौकातील मार्ग, बेलापूर रेल्वे पुलाचा सकाळ भवन मार्ग तसेच आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरासमोरून जाणारा पूल सिडको भवनकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते.
-------------------------------------------
राज्यामध्ये सध्या आंधळे आणि बहिरे सरकार बसले आहे. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने विधिमंडळामध्ये विनंती, अर्ज, आंदोलन करूनही जर हे सरकार, सिडको ऐकत नसेल तर ताकदीने लढा देऊन ऐकायला भाग पाडण्यासाठी हे आंदोलन आहे.
- बाळाराम पाटील, माजी आमदार