
गावदेवीमाता मंदिर सभागृहाचे उद्घाटन
डहाणू, ता. २३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार कोळीवाड्यांचे होणारे सीमांकन कोणीही रोखू शकणार नाही. त्याचबरोबर मच्छीमारांच्या विकासासाठी अनेक योजना आखण्यात आल्या असून, त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मच्छीमारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने येथे असणाऱ्या पर्यटन व्यवसायात स्थानिकांनी उतरल्यास त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे मत पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी मांडले. चिंचणी येथे बुधवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चिंचणीच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर ७० लाख रुपये खर्चून चिंचणी मांगेला समाजाने नव्याने बांधलेल्या गावदेवी माता मंदिर सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजेंद्र गावित बोलत होते. सभागृहाचे उद्घाटन माजी ज्येष्ठ शिक्षक व स्वातंत्र्यसैनिक भास्कर हरी वझे (१०३) होते; तर अध्यक्षस्थानी चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे रजनीकांत श्रॉफ होते. या वेळी माजी सहायक आयुक्त राजेश अक्रे, रमेश वझे, प्रकाश धानमेर, जिल्हा परिषद सदस्य देवानंद शिंगडा, प्रवीण दवणे, जगन्नाथ वझे, सरपंच नीतेश दुबळा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी चिंचणी मांगेला समाजाने बांधलेल्या गावदेवीमाता मंदिर सभागृहालगत बांधण्यात येणाऱ्या स्वयंपाक गृहासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी दहा लाखाचा निधी दिला असून, त्याचे भूमिपूजन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले.