मुंबईच्या पाण्याची ठाण्यात नासाडी

मुंबईच्या पाण्याची ठाण्यात नासाडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे जिल्ह्यातून मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाणी जल बोगद्याद्वारे भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते; मात्र याच जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे शहरातील किसन नगर भागात बोअरवेलसाठीचे खोदकाम करताना नोव्हेंबर महिन्यात हानी झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे पाच ते सहा दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. हे पाणी सक्शन पम्पाद्वारे गटारात व नाल्यात सोडलेले आहे, पण या ठिकाणी अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. ही दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपजलअभियंता यांना पत्राद्वारे केली आहे.

२० जानेवारीपासून हा जलबोगदा बंद करावा लागणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी उकळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या, पण काम अद्याप झालेले नाही. मुख्य भूमिगत जलबोगदा जर कोणत्याही प्रकारे काम करताना फुटला तर संबंधित कंपनी अथवा प्राधिकरणाला दुरुस्तीचा खर्च, पयार्यी व्यवस्थेचा खर्च, वाहून गेलेल्या पाण्याच्या किमतीचा खर्च या दोघांची एकूण रक्कम अधिक ४०० टक्के दंड आकारला जाणार हा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे सांगितले जाते, परंतु या ठिकाणी कुठलीही परवानगी नसताना बोअरिंगसाठी खोदकाम करत बृहन्मुंबई महापालिकेच्या भूमिगत जलबोगद्याला हानी पोहोचवल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवाल पिंगळे यांनी विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com