महापालिकेतील कर्मचारी चौकशीला वेग

महापालिकेतील कर्मचारी चौकशीला वेग

विरार, ता. २३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील विविध कारणांनी कर्मचाऱ्यांवरील विविध आरोपांच्या चौकशीला आता वेग आला आहे. यात वर्ग- क व वर्ग- ड मधील तब्बल ३८ कर्मचाऱ्यांपैकी १७ प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून अहवाल प्राप्त झालेला आहे; तर १० प्रकरणांचा अंतिम निर्णय झाला असून, सात प्रकरणे प्रस्तावित असल्याची माहिती आस्थापना विभागातर्फे देण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिकेतील वर्ग- क व वर्ग- डमधील ४२ हून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी रखडली होती. याबाबत पालिकेने विभागीय चौकशीसाठी सादरकर्ता व चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. विविध कारणांसोबतच कामात हलगर्जी, निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते; तर काही वरिष्ठ लिपीक व अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी आरोप होते. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते; मात्र चार वर्षांहून अधिक काळ या चौकशा रखडल्या होत्या. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व सिद्ध होत नसल्याने त्यांच्या निवृत्तिवेतन, पगारवाढ व पदोन्नती अशा बाबींवर गंडांतर आले होते. त्यामुळे ही चौकशी लवकर व्हावी अशी मागणी होत होती.
यामध्ये महापालिकेतील वर्ग- क व वर्ग- डमधील या ३८ कर्मचाऱ्यांत २० सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता; तर ११ कर्मचाऱ्यांत वाहनचालक, आरोग्य निरीक्षक, अधीक्षक व वरिष्ठ लिपिकांचा समावेश आहे. उर्वरित अन्य ११ कर्मचाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीकरिता पालिकेने काही सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त केलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com