कल्याण रेल्वे स्थानकात लुटपाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण रेल्वे स्थानकात लुटपाट
कल्याण रेल्वे स्थानकात लुटपाट

कल्याण रेल्वे स्थानकात लुटपाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर तीन प्रवाशांना मारहाण करत लुटण्याची घटना मंगळवारी (ता. २२) घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासत त्याआधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. सुखवीर सिंग या प्रवाशाला सकाळी पुणे येथे जायचे होते. याकरिता सोमवारी रात्री ते कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. रेल्वेची वाट पाहत असतानाच त्यांचा डोळा लागला. सुखविंदर हे झोपले असल्याचे पाहून त्या ठिकाणी चार तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांना लाथ मारून तरुणांनी उठवले. धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. अशाच पद्धतीने रेल्वे स्थानकातील दोन प्रवाशांनादेखील मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, रोकड यांसारख्या वस्तू चोरून नेल्या.
याप्रकरणी सुखबीर सिंग यांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. इतर दोन प्रवासी अद्याप तक्रार करण्यास आलेले नाही. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चार आरोपी आढळून आले. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. दीपक मगर, कुणाल गोंधळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून चौथा आरोपी साहिल काकड याचा पोलिस शोध घेत आहेत.