
मूत्रविकाराच्या शस्त्रक्रिया लांबणीवर
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : परळ येथील केईएम रुग्णालयातील मूत्ररोग शस्त्रक्रियागार विभागाच्या (युरोलॉजी) शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. जवळपास मोठ्या शस्त्रक्रियांसाठी चार ते पाच महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागत असून आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना सध्या प्राधान्य दिले जात आहे.
भारतातील जयपूर वैद्यकीय महाविद्यालयानंतर मुंबईतील पालिकेच्या केईएममध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया विभाग युरोलॉजी विभागासाठी दिला गेला आहे. शिवाय नायर, सायन आणि जे जे रुग्णालयाच्या तुलनेतही सर्वाधिक ओटी याच विभागाला मिळतात. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी ओटी मिळाल्यानंतरही प्रतीक्षा यादी वाढती आहे. रुग्णांचा अतिरिक्त भार आणि रुग्ण व्यवस्थापनातील अडचणीमुळे ही यादी वाढली आहे.
विरारच्या ६८ वर्षीय महिलेला किडनीच्या आजारावरील उपचारांसाठी तब्बल वर्षभर केईएम रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अशीच परिस्थिती इथल्या अनेक रुग्णांची आहे. कारण प्रत्यक्षात उपचार घेण्यापूर्वीची प्रक्रिया रुग्णांसाठी अत्यंत किचकट असते. रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर केस पेपर काढण्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळेपर्यंत रुग्णाचा जवळपास ५ ते ६ महिन्यांचा कालावधी जातो. त्यानंतर सोनोग्राफीसाठी चार महिने, सिटिस्कॅनसाठी किमान एक महिना आणि एमआरआयसाठी किमान सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. त्यामुळे रुग्ण व्यवस्थापनात येणारी अडचण रुग्ण प्रतीक्षा यादी वाढवण्यासाठी एक प्रमुख कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
...
खाटा वाढवण्याची गरज
मूत्ररोग शस्त्रक्रियागार विभागात खाटांच्या अडचणीमुळे दोन सत्रांत शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. दोन सत्रांत शस्त्रक्रिया डॉक्टरांची तयारीही आहे, पण दिवसाला आठ शस्त्रक्रिया केल्या गेल्या तरी दोन दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे सर्व खाटा फुल्ल होतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. विभागात एकूण ३२ खाटा आहेत. त्यातच ८ ते १० खाटांची दुरुस्ती सुरू आहे. म्हणजे प्रत्यक्षात २० खाटा उपलब्ध आहेत.
...
३५ ते ४० छोट्या शस्त्रक्रिया
दिवसाला किमान ९ मोठ्या शस्त्रक्रिया आणि ३५ ते ४० छोट्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय आठवड्यातून दोन प्रत्यारोपणाचे रुग्ण असतात. त्यामुळे दोन दिवसांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातात. तसेच आपात्कालीन रुग्ण, वयोवृद्ध, लहान मुले आणि महिला यांना प्राधान्य दिल्याने तरुणांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडतात. याच तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये एक दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास दोन ते तीन महिन्यांत रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतील, मात्र त्यासाठी सुविधांत वाढ होण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात. किमान ५० खाटांची सुविधा करून द्यावी, अशी मागणी डॉक्टर्स करतात.
...
...तर संख्या वाढू शकेल!
या विभागात प्रत्येक ओपीडीच्या दिवशी २५० रुग्ण येतात. वर्षभरात सुमारे ५० ते ६० मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया होतात. रुग्णालयात असलेल्या चार ओटींमध्ये सध्या दररोज तीन वाजेपर्यंत मोठ्या; तर सात वाजेपर्यंत छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात. विभागात खाटांची संख्या वाढल्यास शस्त्रक्रियांची संख्यादेखील वाढेल, शस्त्रक्रियांचा कालावधी कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
...
डिजिटायजेशन हवे!
शस्त्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यात डिजिटायजेशनचा खूप मोठा फरक पडेल, असे मत डॉक्टर व्यक्त करतात. मोठ्या शास्त्रक्रियांमध्ये किडनी मूतखडा, प्रत्यारोपण; तर छोट्या शस्त्रक्रियांमध्ये प्रोस्टेट बायोप्सी आणि मूत्राद्वारे होणारा रक्तस्राव, कर्करोग, स्टेंट, अपघाती जखमांचा समावेश असतो.
...
समस्या लवकरच सोडवू!
प्रत्येक विभागाची कामाप्रती इच्छाशक्ती राहिल्यास आणि विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छाशक्ती असल्यास रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल. प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासन सक्रिय आहे. या समस्येवर लवकरच कार्यवाही होइल, असे केईएम रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.