
खड्ड्यात बुडून दोन लहानग्यांचा मृत्यू
अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) ः जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन अल्पवयीन मुले बुडून मरण पावल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात घडली. सूरज मनोज राजभर (वय ८) आणि सनी प्रमोद यादव (वय ६) अशी या मुलांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २२) घडली.
सनी आणि सूरज या दोघांची घरे समोरासमोरच आहेत. बुधवारी दुपारी दोघे खेळण्यासाठी बाहेर गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पण त्यांचा पत्ता लागला नाही. शेवटी एमआयडीसीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी केलेल्या खड्ड्याजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. तेव्हा दोन्ही मुले त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचे समजले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. सूरज आणि सनी दोघांचे कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील असून मुंबईत रोजगारासाठी आले होते. लहान मुले एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे दगावली आहेत. काही महिन्यांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदला, पण नंतर तो बुजवण्यात आला नाही. दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना संबंधितांनी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ जगदीश फुलोरे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी केली. याप्रकरणी संबंधित दोषींविरोधात गुन्हा दाखल दाखल झाल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली.