
आगीत होरपळून कामगार जखमी
मनोर, ता. २३ ः तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी (ता. २३) सकाळी बजाज हेल्थ केअर या कंपनीत आग लागली. यात होरपळून एक कामगार जखमी झाला आहे. आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक ई-६३ मधील बजाज हेल्थ केअर या बल्क ड्रग्जचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीच्या उत्पादन विभागात ही आग लागली. रिॲक्टरमधून आलेल्या आगीत येथे काम करत असणारा कामगार होरपळून जखमी झाला. नरेंद्र कुमार गौतम (वय २८) असे या कामगाराचे नाव आहे. त्याला बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. आगीच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीमधून अपघातासोबतच विनाप्रक्रिया घातक रासायनिक सांडपाणी चोरून गटारात सोडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रदूषणकारी कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.