
दंडवसुलीतही महिला टीसीची छाप!
मुंबई, ता. २३ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १०० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एवढ्या मोठ्या कारवाईत प्रथमच महिला तिकीट तपासनिसांच्या तेजस्विनी पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परिणामी दंडवसुलीचा विक्रम करणारा मुंबई विभाग पहिला ठरला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवली. तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते २६ फुब्रवारी २०२३ दरम्यान १८.०८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. कारवाईअंतर्गत १००.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे एसी लोकलमधील २५ हजार ७८१ प्रकरणांमधून ८७.४३ लाखांचा महसूल मिळाला. प्रथम श्रेणी डब्यांमधील १.४५ लाख प्रकरणांमधून ५.०५ कोटी दंडाची वसुली करण्यात आली. कारवाईत तेजस्विनी पथकातील महिला टीसीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने उल्लेखनीय यश गाठणे शक्य झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
उत्कृष्ट तिकीट तपासनिस
- सुधा डी : ६,१८२ प्रकरणांमधून २०.१५ लाख दंड
- नम्रता एस : ४,२९३ प्रकरणांमधून १९.८८ लाख दंड
- अनिता खुराडे : ५,३७१ प्रकरणांमधून १९.२६ लाख दंड
- चित्रा वाघचौरे : ५,५२३ प्रकरणांमधून १४.८२ लाख दंड
- दीपा वैद्य ः ४,१३४ प्रकरणांमधून १५.७७ लाख दंड