सेन्सेक्स ५८ हजारांखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स ५८ हजारांखाली
सेन्सेक्स ५८ हजारांखाली

सेन्सेक्स ५८ हजारांखाली

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः अमेरिकी फेडरल बँकेने आज (ता. २३) अपेक्षित अशी व्याजदरवाढ केल्याने भारतीय शेअर बाजारात नफावसुली झाली आणि सेन्सेक्स व निफ्टी अर्धा टक्क्याच्या आसपास कोसळले. दोन दिवसांची तेजी संपुष्टात आणताना सेन्सेक्स २८९.३० अंश; तर निफ्टी ७५ अंश घसरला. निफ्टीने आज १७ हजारांचा स्तर कसाबसा टिकवला असला, तरी सेन्सेक्स मात्र ५८ हजारांखाली घसरला.

अमेरिकी फेडने बुधवारी पाव टक्का व्याज दरवाढ केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली होती. मात्र, त्यानंतर आज सकाळी अमेरिकी शेअर बाजारांचे फ्युचर्स तेजी दाखवत असल्यामुळे जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारातही तेजी-मंदीचा खेळ सुरू झाला. सकाळी भारतीय शेअर बाजार थोडे कोसळले होते. पुन्हा दुपारपर्यंत त्यांच्यात तेजी आली. मात्र शेवटच्या तास दोन तासातील नफावसुलीमुळे पुन्हा शेअर निर्देशांक गडगडले. दिवस अखेरीस सेन्सेक्स ५७,९२५.२८ अंशांवर; तर निफ्टी १७,०७६.९० अंशांवर स्थिरावला.

धोक्यात आलेल्या सर्व बँकांना सरसकट थेट हमी देणार नाही, असे विधान अमेरिकेच्या वित्तमंत्र्यांनी केल्यामुळेही सर्वच जागतिक शेअर बाजारांवर किंचित प्रतिकूल परिणाम झाला. त्यातच फेडरल बँकेकडूनही निश्चित संकेत न मिळाल्यामुळे बाजाराला दिशा मिळत नाही. त्यामुळे भारतीय शेअर बाजार अजूनही विशिष्ट मर्यादेतच फिरत राहतील. त्यातच परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीमुळेही दडपण राहील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. हिंडेनबर्गने आपला दुसरा बहुचर्चित अहवाल जाहीर करण्याचा इशारा दिल्यामुळेही चर्चेला उधाण आले. हा गौप्यस्फोट कुठल्या देशातील कुठल्या कंपनीबाबत असेल, याविषयी चर्चा सुरू होती.
---
आज बँका, आयटी आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र तोट्यात होते. बीएसईवरील दीडशे शेअरचे भाव वर्षभराच्या किमान भावपातळीवर गेले होते. निफ्टीमधील स्टेट बँक, एशियन पेंट, एचसीएल टेक, कोटक बँक, बजाज ऑटो या शेअरचे भाव घसरले; तर निफ्टीमध्ये हिंदाल्को, नेस्ले, एअरटेल, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील यांचे भाव वाढले. निफ्टीच्या प्रमुख पन्नास शेअरपैकी ३० शेअरचे भाव घसरले, तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी १७ शेअरचे भाव घसरले.
---
निफ्टी आज १७,२०० ला स्पर्श करूनही जागतिक आर्थिक अनिश्चित वातावरणामुळे त्या पातळीवर टिकू शकला नाही. अशा स्थितीत अमेरिकी शेअर बाजार नरमगरम राहिले; तर निफ्टी सतरा हजारांखाली जाऊ शकतो. निफ्टी १७,२००-१७,२५० च्यावर गेल्यानंतरच थोडीफार तेजी येऊ शकेल.
- राजेश भोसले, तांत्रिक विश्लेषक, एंजल वन