
तरुणीवर सामूहिक बलात्कार
नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : विरारमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्व साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावरील जंगलात बुधवारी (ता. २२) दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबत विरार पोलिस ठाण्यात मारहाण करून, सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
धीरज राजेश सोनी (वय २५) आणि यश शिंदे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी दुपारी २० वर्षांची तरुणी आपल्या मित्रासोबत साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावर फिरायला गेली होती. एकांतात मित्रमैत्रिणी बसलेले पाहून आरोपींनी पहिल्यांदा या दोघांचे फोटो काढले. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करत पैशांची मागणी केली. आपली बदनामी होऊ नये, यासाठी मुलीच्या मित्राने आपल्या मित्राकडून ५०० रुपये फोन पेवरून पाठवले; पण एवढ्यावर न थांबता आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तरुणीच्या मित्राने त्यांना प्रतिकार केला. आरोपींच्या जवळ असलेली बिअरची बॉटल तरुणाने त्यातील एकाच्या डोक्यात मारली; पण दोन्ही आरोपींनी त्याला मारहाण करत नग्न करत त्याचे हातपाय बांधून टाकले. तसेच तरुणीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
---
असा झाला उलगडा
हातपाय बांधून टाकलेल्या अवस्थेत असलेला तरुणीचा मित्र नागरिकांना मदतीची याचना करत होता; पण कुणीही त्याला मदत करत नव्हते. पण, एका जागरूक नागरिकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन चौकशी केली असता तरुणाने घडलेला प्रकार सांगितला. तरुणीचा शोध घेतला असता, ती तिच्या घरी गेल्याचे कळले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो रुग्णालयात गेला असावा, असा कयास पोलिसांनी लावला. तेव्हा तो नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे आढळून आले. त्याची चौकशी केली असता दुसऱ्या आरोपीचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.