
माथाडी कामगार चळवळीची अवस्था वाईट ः पाटील
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट आहे, याची मलाही खंत वाटते. मीही कुठेतरी कमी पडत आहे, असे मला वाटते, अशी भावना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुर्भे येथील माथाडी भवनात झालेल्या सभेत ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले की, अण्णासाहेबांच्या ४९ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोकप्रतिनिधीला बोलावण्याची इच्छा झाली नाही. सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उद्ध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे कामकाज अन्यत्र हलवले जाते; पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री हे उद्योगपतीच होते आणि आताचेही आहेत. मग कामगारांना न्याय कसा मिळणार, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली; तर संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, माथाडी कामगार चळवळ अत्यंत वाईट दिशेने आणि रस्त्याने वाटचाल करीत आहे. ती बदलण्याकरिता आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत. अण्णासाहेबांच्या ऐतिहासिक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर आपली अभेद्य एकजूट कायम राहिली पाहिजे, असे आव्हान त्यांनी उपस्थित कामगारांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटने जनसंपर्क अधिकारी व संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष, एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. भारती पाटील, पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, सेक्रेटरी मनोज जामसुतकर, व्यापारी प्रतिनिधी मयूरभाई सोनी, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, रवी शिंदे उपस्थित होते.