मुंबई पालिकेची १९ हजार ५०० कोटींची थकबाकी

मुंबई पालिकेची १९ हजार ५०० कोटींची थकबाकी

विष्णू सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : राज्य सरकारच्या विविध विभागांकडे सहायक अनुदान आणि मालमत्ता करापोटी मुंबई महापालिकेची तब्बल १९ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच्या पालिका आयुक्तांनी थकबाकीची रक्कम मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता; मात्र ही थकबाकी काही मिळाली नाही. विद्यमान आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही सरकारकडे थकबाकी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे आयुक्त चहल यांच्या पाठपुराव्यानंतर तरी थकबाकी मिळणार का, याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विविध कर आणि अनुदान यापोटी राज्य सरकारकडे पालिकेची सात हजार २२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या ५,५१९ कोटी रुपये अनुदानाचाही समावेश आहे. त्यातच १ जुलै २०१७ पासून जीएसटी (वस्तू सेवा कर) लागू झाल्याने पालिकेला दरवर्षी मिळणाऱ्या ९ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. जकातीपोटी नुकसानभरपाई म्हणून १२ हजार ३४४ कोटी रुपये असे एकूण १९ हजार ५०० कोटी रुपये पालिकेला राज्य सरकारकडून येणे आहे.

राज्य सरकारकडून पालिकेला येणे असलेल्या रकमेच्या वसुलीबाबत पालिकेच्या संबंधित खात्याकडून विविध विभागांशी पाठपुरावा करण्यात येत आहे; मात्र त्याची दखल महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान सरकारनेही अद्याप घेतली नसल्याचे पालिकेच्या लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आयुक्तांचे सरकारला साकडे
मुंबई शहरात विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विकासकामे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची गरज विचारात घेता ही थकबाकी राज्य सरकारने पालिकेस देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे साकडे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी राज्य सरकारला घातले आहे.

सरकार कोणाचेही असो, सरकारने पालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी तातडीने द्यायला हवी. थकबाकी मिळाल्यास रखडलेल्या प्रकल्पांना वेग देता येईल. जकातीपोटी कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई पालिकेला देण्याबाबत राज्य सरकार चालढकल करीत आहे. सरकारने पालिकेच्या आर्थिक हिताचा विचार करायला हवा.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com