
नवी मुंबई काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ ः काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर सुरतमध्ये न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याच्या निषेधार्थ आज (ता. २३) नवी मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत जेल भरो आंदोलन केले. वाशी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या नवी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
राहुल गांधी यांना आज सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निकालानंतर वाशी येथील काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकवटल्यानंतर जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाशी पोलिस ठाण्यापर्यंत पायी चालत मूक मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी यांची सध्या देशभरात लोकप्रियता वाढत असल्यामुळे हे सरकार त्यांच्यावर सूड उगवत असल्याची टीका कौशिक यांनी केली. याप्रसंगी माजी नगरसेविका मीरा पाटील, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत, माजी जिल्हाध्यक्ष लिना लिमये, नवी मुंबई जिल्हासिचव विद्या भांडेकर, तुर्भे तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, कोपरखैरणे तालुका कार्याध्यक्ष सुनील पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.