
खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) : जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमधील नेवाळीत घडली. सूरज राजभर (८) आणि सनी यादव (६) अशी या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल दाखल झाल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली आहे.
अंबरनाथच्या नेवाळी नाका, वसार रोडवरील बाबूशेठ पाटील चाळीत सूरज आणि सनी हे दोघेही समोरासमोर रहातात, बुधवारी (ता. २२) दुपारी ते दोघेही खेळण्यासाठी घराबाहेर गेले. बराच वेळ झाला तरी दोघे आले नाही म्हणून कुटुंबीयांनी सायंकाळी शोधाशोध सुरू केली; परंतु त्यांचा शोध लागला नाही.
दरम्यान, बाबूशेठ पाटील चाळीपासून काही अंतरावरच एमआयडीसीच्या जलवाहिनीचा खड्डा खोदण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने या खड्ड्यात पाणी साचले होते. या खड्ड्याजवळ दोघांच्या चपला आढळल्या. त्यानंतर अधिक तपास केला असता खड्ड्यातील पाण्यात बुडून सूरज आणि सनीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
एकूलता एक ‘सनी’
उत्तर प्रदेशमधून उदरनिर्वाहासाठी नेवाळी परिसरात मनोज राजभर मुंबईत आले होते. सूरज हा त्यांचा मोठा मुलगा असून त्याला एक लहान बहीण आणि भाऊ आहे. राजभर परिवारही नुकताच या चाळीत रहाण्यास आले होते. सनी हा पहिली इयत्तेत शिकत होता. चार बहिणींच्या नंतर सनीचा जन्म झाला होता. या दोघांच्या अपघाती मृत्यू चाळीत शोककाळा पसरली आहे.
एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे ही लहान मुले दगावली आहेत. काही महिन्यांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदला; पण तो बुजवण्यात आला नाही. दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी.
- जगदीश फुलोरे, स्थानिक रहिवासी