ठाण्यातील ११५ गावे हागणदारीमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील ११५ गावे हागणदारीमुक्त
ठाण्यातील ११५ गावे हागणदारीमुक्त

ठाण्यातील ११५ गावे हागणदारीमुक्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सार्वजनिक शौचालय आणि वैयक्तिक शौचालयाचे महत्त्‍व याबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे ठाणे जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात हागणदारीमुक्तीचे व घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापनाचे निकष पूर्ण करणाऱ्या ११५ गावांनी ग्रामसभेच्या ठरावानंतर हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि कल्याण या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामुळे वैयक्तिक लाभाच्या शौचालयांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यात कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यांतील बहुतांश भाग हा शहरी झाल्यामुळे आणि ग्रामीण भाग कमी असल्यामुळे तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्तही झाले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून २०१७ मध्ये हागणदारीमुक्त ठाणे जिल्ह्याची घोषणा करण्यात आली.

पाच हजार वैयक्तिक शौचालयांचे वाढीव उद्दिष्ट
अनेकदा विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वैयक्तिक शौचालयांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाच हजार वैयक्तिक शौचालयांचे वाढीव उद्दिष्ट ठेवण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी व जागा उपलब्ध असतील, अशा ठिकाणी ६८ वाढीव सार्वजनिक शौचालये उभारणीचे उद्दिष्टे ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशन प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली.

काय आहेत निकष-
१. प्रत्येक कुटुंबाला शौचालय
२. बाजार परिसरात सार्वजनिक शौचालय
३. शाळा, अंगणवाडी, रुग्णालये आदी ठिकाणी शौचालयांची व्यवस्था
४. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण