हिमालय पूल आठवडाभरात खुला होणार

हिमालय पूल आठवडाभरात खुला होणार

मुंबई, ता. २४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. आठवड्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याची तयारी पालिकेच्या रस्ते व पूल विभागाने सुरू केली असून, सध्या पुलाच्या उद्‍घाटनाची लगबग सुरू झाली आहे. हा पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळला होता. त्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.

नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल टिकाऊ स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला असून, पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तपासणी झाल्यानंतर व इतर प्रक्रिया येत्या २८ मार्चपर्यंत पूर्ण करून १ एप्रिलपर्यंत तो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दीड वर्षापासून पुलाचे काम सुरू होते. नव्याने बांधण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत गेले. त्यात कोरोनामुळे पुलाच्या कामास आणखी विलंब झाला. मुंबईत पोलादापासून तयार करण्यात येणारा हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर त्याचा दररोज सुमारे ५० हजार पादचाऱ्यांना फायदा होणार आहे.

मुंबईतील जुने पूल लोखंडापासून तयार करण्यात आले आहेत. खाऱ्या हवेचा लोखंडावर परिणाम होत असल्याने ते गंजत जातात. त्यासाठी पुलांची वारंवार देखभाल, दुरुस्ती करावी लागते. त्यासाठीच पालिकेने पोलादाचा पर्याय निवडला असून, ते लवकर खराब होणार नाहीत, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुलाकडे सरकता जिनाही बसविला जाणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांगांना पुलापर्यंत जाणे सुलभ होईल. हिमालय पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे.

अडथळ्यांची शर्यत
हिमालय पुलाच्या निविदा प्रक्रियेसह आरेखनातील बदलाने आणखी कालावधी वाढला. रात्रीच्या सुमारास सलग कामासाठी दोन तासांचा अवधी मिळत असल्याने एकूण वेळापत्रकावर परिणाम झाला. या सर्व आव्हानांवर मात करत अखेर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. न गंजणारे स्टेनलेस स्टील या पुलासाठी वापरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गंजण्याचा धोका नसेल आणि हे स्टील ५० वर्षे टिकेल. पुलाच्या एका गर्डरची लांबी ३५.२११ मीटर इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com