पुन्हा अँटीजेन चाचण्यांवर भर

पुन्हा अँटीजेन चाचण्यांवर भर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : शहरात एच३ एन२ च्या प्रादुर्भावाने एकाचा मृत्यू झाल्यावर ठाणे महापालिका प्रशासनाने पुन्हा सर्वच गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढली आहे; मात्र नागरिकांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच सद्यःस्थितीत कोरोनाबाधितांमध्ये आढळले रुग्ण हे १८ ते ८० वयोगटातील आहे. १८ वर्षांखालील एकही रुग्ण कोरोनाबाधित सापडलेला नाही. ठाणे महापालिका हद्दीत नोंद होणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

एकीकडे कोरोना आटोक्यात आला, असे म्हटले जात होते. पण, तो पूर्णपणे आटोक्यात आला नव्हता. एक-दोन रुग्ण दिवसाला रोज आढळून येत होते. ती संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागली. त्यातच गेल्या आठ दिवसांत ही झपाट्याने वाढली. १६ ते २३ मार्च दरम्यान ठाणे महापालिका परिसरात २१६ रुग्णांची नोंद झाली. तसेच १ ते २३ मार्चदरम्यान एकूण २८५ रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठक घेत, अँटीजेन चाचण्या वाढण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार चाचण्याही वाढण्यात आल्या आहेत.

सध्या दिवसाला दोन हजार ते दोन हजार २०० अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. मात्र ही चाचणी करून घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नाही. मागील अनुभवामुळे ते चाचणी करून घेण्यासाठी प्रामुख्याने टाळत असल्याचे दिसत आहे. जरी सापडणारे रुग्णांची संख्या जास्त असली तरी त्यांची लक्षणेही सौम्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना होम क्वारंटाईन ठेवण्यावर भर दिला गेला आहे.

खासगी रुग्णालयाला रुग्णांची पसंती
ज्यांना उपचारार्थ गरज आहे, अशा रुग्णांवर ठाणे पालिका रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा वयोमानाचा विचारल्यास हे रुग्ण प्रामुख्याने १८ ते ८० वर्षांपर्यंतचे आहे. त्यातच १८ वर्षांखालील एकही रुग्ण अद्यापही नोंदवला गेला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

कोरोना मृतांना सहव्याधी
दुसरीकडे दगावलेले रुग्ण हे ७० ते ८० या वयोगटातील आहेत. त्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा इतरही सहव्याधी असल्याची बाबही पुढे आली आहे. याशिवाय, इतर शहरांपाठोपाठ ठाण्यात एच३ एन२ चे रुग्ण आढळण्यास सुरू झाली असून तो आकडा १९ इतका आहे. त्यातच बुधवारी या आजाराने एक जण दगावला आहे.

नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन
एकीकडे कोरोना दुसरीकडे एच३ एन२ या विषाणूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य विभाग सतर्क होत नागरिकांना काळजी घेण्याबरोबर कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याबाबत आवाहन करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com