नवी मुंबई अवतीभवती

नवी मुंबई अवतीभवती

ज्वेल ऑफच्या तलावाच्या स्वच्छतेची मागणी
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या या पर्यटन स्थळाची दुरवस्था झाली आहे. येथील तलावात गाळ साचला आहे. या तलावाची स्वच्छता करून त्याचे सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धाचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलावात परिसरातील सांडपाणी सोडले जात असून, कचरा व निर्माल्यही टाकले जाते. शेवाळे, वनस्पती आणि सांडपाण्यामुळे तलाव प्रदूषित झाला असून, दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारही येत आहेत. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे साचलेला गाळ काढणे, अनावश्यक वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणणे, किनारा सौंदर्यीकरण, कुंपण घालून, जॉगिंग ट्रॅक करणे, अशा कामांनी तलावाचा विकास करणे आवश्यक असल्याचे मंदा म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पनवेल पालिका मुख्यालयात शहिदांना अभिवादन
नवीन पनवेल (वार्ताहर) : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ मध्ये ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ''शहीद दिवस'' म्हणून साजरा केला जातो. शहीद दिनानिमित्ताने महापालिका मुख्यालयात आज स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपायुक्त गणेश शेटे, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, सहायक आयुक्त हरिश्चंद्र कडू, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, नागरी सेवा विभागाचे हरेश जाधव, सचिव तिलकराज खापर्डे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बोकडविऱ्याच्या अध्यक्षपदी त्रिशूल ठाकूर
उरण (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या दिवशी उरण तालुक्यातील बोकडविरा गावात ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असते. लोकशाही पद्धतीने ग्रामस्थ अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतात. या वर्षी निवडणुकीत बोकडविरा गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्त त्रिशुल परशुराम ठाकूर आणि सूर्यकांत लहू पाटील हे दोन उमेदवार अध्यक्ष पदासाठी उभे होते. यात सूर्यकांत यांना पराभूत करून त्रिशूल ठाकूर दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांची बोकडविरा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उरणमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी सामना रंगला
उरण (बातमीदार) : तालुक्यातील पागोटे येथे उपसरपंच चषक रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली होती. यात हनुमान चरी यांनी पहिला क्रमांक पटकावला. रायगड जिल्ह्यातील एकूण १६ संघांनी यात सहभाग घेतला होता. या वेळी अनेक संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगलेला पाहावयास मिळाला.
उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित तांडेल यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला रसिक प्रेषक व खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक - हनुमान चरी, दुसरा - नवकिरण भेंडखळ, तिसरा - सगुनाबाग (नेरळ), तर चौथा क्रमांक गणेश शिर्की यांनी पटकावला. यामध्ये उत्कृष्ट खेळाडू करण भगत (चरी), उत्कृष्ट चढाई हर्षद (नेरळ), उत्कृष्ट चढाई अमित ठाकूर (भेंडखळ), पब्लिक हिरो - मंथन म्हात्रे (शिर्की) यांनाही वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ तांडेल, जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कडू, विक्रांत कडू, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी केले. तर उपस्थित ग्रामस्थ, खेळाडूंनी उपसरपंच सुजित तांडेल यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com