
विक्रमगडमध्ये फ्रीजच्या जमान्यातही माठ इन डिमांड
विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : यंदा मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे थंडगार पाणी पिणाऱ्यांची संख्या प्रचंड असली तरीही गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे. विक्रमगडच्या कुंभारवाड्यात ही मागणी पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
विक्रमगड येथील कुंभारवाड्यात डिसेंबरपासूनच माठ बनविण्याचे काम सुरू होते. गुजरातमधून माठासाठी लागणारी माती आणली जाते. त्यानंतर मातीवर प्रक्रिया केल्यानंतर आकर्षक माठ बनविले जातात. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे कुंभार व्यवसाय करण्यात येत असल्याचे व्यावसायिक प्रजापती यांनी सांगितले. त्यांच्या येणाऱ्या तिसऱ्या पिढीनेही हाच व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. संपूर्ण वर्षभर सण व मागणीनुसार त्यांची कामे सुरू असतात. सध्या उन्हाळा सुरू असल्याने मातीच्या माठांची विक्री ते करीत आहेत. सध्या १५० ते ३०० रुपयांपर्यंत हे माठ उपलब्ध आहेत. पूर्वी कुंभारवाड्यातच माठ बनविले जायचे; परंतु भट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने गेल्या काही वर्षांपासून माठ बनविण्याचे काम कमी झाल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्रामुख्याने माठातील पाण्याचाच उन्हाळ्यात वापर केला जातो. गरिबांच्या या फ्रीजला विक्रमगड तालुक्यात मागणी आहे. त्यामुळे आधुनिक युगात फ्रीजच्या जमान्यातही माठाला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
.....
नक्षीदार माठांना अधिक मागणी
यंदा नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या माठांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यामध्ये काही राजस्थानवरून आलेले विक्रीतेही गावातील गल्लीबोळात खांद्यावर माठ घेऊन फिरताना दिसत आहेत. उन्हाळ्यात माठांच्याही विक्रीत वाढ होत असून अनेक वेळा माठ कमी पडतात, असे येथील विक्रेते सांगतात.
....
यंदा महागाई असल्याने नाईलाजास्तव माठांची किंमत वाढली आहे. माती, रंग, इतर साहित्य बाजारात महागले. तसेच फ्रीजच्या जमान्यातही माठाला मोठी मागणी आहे. आम्ही माठ व मडकी विक्रीसाठी गुजरातवरून येत असतो.
- आलम भाई, माठ विक्रेता