मोहफुलापासून पौष्टिक, गुणकारी खाद्य पदार्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहफुलापासून पौष्टिक, गुणकारी खाद्य पदार्थ
मोहफुलापासून पौष्टिक, गुणकारी खाद्य पदार्थ

मोहफुलापासून पौष्टिक, गुणकारी खाद्य पदार्थ

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २६ : आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामध्ये अनेक वनौषधी आहेत. या वनसंपदेपासून ग्रामीण भागातील महिला आपल्या कौशल्यातून विविध वस्तू आणि पौष्टिक खाद्यपदार्थ बनवत आहेत. मात्र, त्यांचा व्यवसाय वाढीसाठी आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठ उपलब्धेची गरज आहे. अशाच कलागुण आणि कौशल्याने मोखाड्यातील ऊधळे येथील आदिवासी महिला रंजना जोशी आणि त्यांच्या बचत गटाने मोहफुलापासून पौष्टिक खाद्य पदार्थ बनवले आहेत. तसेच गवतापासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये जंगलात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. यामध्ये वनौषधी सह वेगवेगळ्या हंगामात येणाऱ्या फळ आणि फुलांपासुन अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवले जातात. जंगलातील टाकाऊ वस्तूंपासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. मात्र, हे बनवलेले पदार्थ आणि वस्तू त्या गाव-खेड्यापर्यतच मर्यादित राहतात. मर्यादित भांडवल आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे या महिलांचे कलागुण आणि कौशल्य त्यांच्यापूरते मर्यादित राहिले आहे.
महिला बचत गट एरवी लोणचे, पापड यासारखे पदार्थ बनवतात. मात्र वनसंपदेपासून काही पौष्टिक आणि रूचकर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी मोखाड्यातील ऊधळे येथील आदिवासी महिला रंजना जोशी आणि त्यांच्या भारत माता महिला बचत गटाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. मोहफुलापासून केवळ दारूच बनवली जाते असे नाही, तर मोहाचे झाड हे बहुअंगी गुणकारी आहे. याची माहिती घेऊन याच मोहफुलापासून चटणी, लाडु तयार केले असून हे पदार्थ खुप चविष्ट आणि पौष्टिक आहेत. तसेच मोहाच्या बियांचे तेल आणि फळांपासून स्वादिष्ट आणि रूचकर भाजी देखील बनवली आहे.
रंजना जोशी आणि त्यांच्या बचत गटाने नागलीपासून देखील विविध पदार्थ तयार केले आहेत. पापड, लोणचे असे पदार्थ देखील तयार करून त्या विक्री करत आहेत. त्यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत, पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मदतीचा हात दिला आहे. त्यांनी या बचत गटाला पुणे, नवी मुंबई आणि नाशिक येथे स्टॉल उपलब्ध करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

....
अल्प दरात, जास्त दिवस टिकणाऱ्या वस्तू
बाजारात मोहफुलाचे लाडू १२०० ते १५०० रुपये किलो आहेत. चटणी व मनुका ८०० ते १००० किलो दराने विकला जात आहे. मात्र, रंजना जोशी व त्यांच्या बचत गटाने तयार केलेले लाडू ८०० ते १००० रुपये किलो; तर चटणी ६०० रुपये दराने उपलब्ध आहेत. या वस्तू किमान सहा महिन्यांपर्यंत टिकतात, असा दावा रंजना जोशी यांचा आहे.
...
विविध आजारांवर गुणकारी
मोहाच्या फुलांपासुन बनवलेले लाडू, चटणी या सांधेदुखी, अशक्तपणा, उन्हाचा त्रास, पोटदुखी, आणि मधुमेह यांसह अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे या वस्तु खाण्यास रुचकर आणि स्वादिष्ट असून ते विविध आजारांवर गुणकारी ठरल्याने, बहुपयोगी ठरत आहेत.
....
गवतापासून आकर्षक शोभेच्या वस्तू
बचत गटाच्या माध्यमातून रंजना जोशी या गवतापासून टोपली, टोपी, आकर्षक शोभेच्या वस्तू तयार करतात. या वस्तूदेखील त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्यांनी बनवलेल्या वस्तूंना तेव्हढी मागणी नाही. त्यांच्या या कलाकुसरीचे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप वाघ, येथील सरपंच लता वारे, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केले आहे. तसेच व्यवसायाला चालना देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
.....
ग्रामीण भागातील सर्व महिलांना या सर्व गोष्टीं शिकवून पुढे न्यायचे आहे. मात्र, आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठ उपलब्ध नाही. वर्षातून दोन, तीन दिवस शहरातील महोत्सवात, आम्हाला माल विक्री करण्याची संधी मिळते. पण आम्हाला व्यवसाय मोठा करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी गरज आहे, ती आर्थिक मदतीची आणि बाजारपेठेची. त्यासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमातून आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.
- रंजना जोशी
......
मोखाडा : रंजना जोशी यांनी गवतापासून विविध आकर्षक वस्तू बनवल्या आहेत.