
पेणमधील हजारो एकर भातशेती पाण्यात
पेण, ता. २६ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील खारेपाट, वाशी, सरेभाग विभागातील उघाडीचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्यामुळे वारंवार ते फुटत असल्याने हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उघाडीचे काम सुरू असताना पूर्व कल्पना न देता ठेकेदाराने कामासाठी बांधलेले बांध फोडला. यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या उधाणामुळे खारे पाणी शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरेभाग येथील टॉवरजवळील उघाडीचे कामासाठी पाणी अडवण्याकरिता तयार केलेला बांध ठेकेदाराने समुद्राची भरती-ओहोटीची वेळ लक्षात न घेता फोडल्याने खारे पाणी भातशेतीत शिरले. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० एकर शेतीचे नव्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अनेक दिवस येथील शेतकरी उघाडीचे दरवाजे बसवण्याची मागणी करीत आहेत, मात्र खारलॅन्ड विभागाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आतापर्यंत सरेभाग गावातील जवळपास हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी हताश झाला आहेत. उधाणामुळे खाडीलगत असणारी भातशेती नापिक व ओसाड होत चालल्याने शेती पिकवणार तरी कशी, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
पेणमधील वाशी, सरेभाग येथील उघाडीबाबत खारलॅड विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. ही उघाडी वारंवार फुटून खारेपाणी शेतीत शिरल्याने हजारो एकर शेतीचे तसेच आजूबाजूला घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी व नुकसान भरपाई द्यावी.
- राजन झेमसे, शेतकरी
वाशी-सरेगाव येथील उघाडीचे काम सुरू आहे. शेतात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. या संदर्भात उघाडीचे कामाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांकडून पाहणी करून लवकरच योग्य निर्णय घेऊ
- राजेंद्र खेडेकर, अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना