ठाण्यात शनिवार ठरला आंदोलनांचा

ठाण्यात शनिवार ठरला आंदोलनांचा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने राहुल यांच्या समर्थनार्थ ठाणे शहर काँग्रेससह युवक काँगेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शहर काँग्रेसने राहुल गांधींवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला; तर युवक काँग्रेसने लोकशाहीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून कारवाईला कडाडून विरोध केला. दुसरीकडे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या विरोधात भाजपाने आंदोलन; तर शिवसेनेने (शिंदे गट) मोर्चा काढला. ही सर्व आंदोलने काही तासांच्या अंतरावर एकापाठोपाठ झाल्याने शनिवार हा आंदोलनांचा ठरल्याचे पाहायला मिळाले.
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्वरित केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधी यांच्या संसद सदस्यपदाचे निलंबन केले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असताना ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. २५) आक्रमक होत राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व ठाणे काँग्रेस प्रभारी संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

........
लोकशाहीची अंत्ययात्रा
ठाणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ लोकशाहीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ती थेट ठाण्याच्या मुख्य जवाहर बाग स्मशानभूमीत नेली. याप्रसंगी लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशा घोषणा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

...........
भाजपचे आंदोलन
ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यातील कोर्ट नाका येथे भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी व तेली समाजाचा अपमान केला आहे. या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी शिक्षा भोगावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

...........
शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी मोर्चा
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला. त्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथून ठाणे काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. जितेंद्र आव्हाड मैदानात
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची सजा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधी यांची संसद सदस्यपदाचे निलंबन केले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरभर होर्डिंग्ज लावून ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश दिला आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावले आहेत. भारत जोडो यात्रेमधील काही छायाचित्रे वापरून हे होर्डिंग्ज तयार करण्यात आले असून छायाचित्रांखाली ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश लिहिला आहे. शिवाय, ‘वुई स्टँड विथ राहुल गांधी’ असा हॅशटॅगही दिला आहे. या होर्डिंग्जची सबंध ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com