क्षयरोगींच्‍या मृत्यूदरात घट

क्षयरोगींच्‍या मृत्यूदरात घट

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : २०२५ पर्यंत क्षयरोगही हद्दपार करण्याच्या दृष्‍टीने वाटचाल सुरू आहे. क्षयरोग रुग्णांना शोधून त्यांना उत्तम उपचार आणि पोषक आहार मिळावा यासाठी क्षयरोग शोधमोहीम व जागरूकता निर्माण करण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून क्षयरोग रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. क्षयरोग आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अवघ्या दोन टक्क्यांवर आले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के इतके झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्षयरोगाला चाप लावण्यासाठी देशभरात क्षयरोग शोधमोहीम व जागरूकता अभियान राबवले जात आहे. त्यानुसार क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम राज्यात प्रथम १९९८ पासून सुरू करण्यात आला. ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक तळागाळात जाऊन क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. त्यानुसार ८ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्‍या क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत एक लाख ९३ हजार ७५३ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक हजार ५१९ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्या रुग्णांची तपासणी केली असता, २३ जणांना क्षयरोगाची लागण झाल्याची बाब समोर आली असून, त्या सर्वांवर उपचार करण्यात येत आहे. क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार आणि दरमहा ५०० रुपये देण्यात येत आहे. अक्षया प्लस प्रकल्पांतर्गत क्षय रुग्णाच्या सहवासातील नातेवाईकांना क्षय प्रतिबंधात्मक औषध उपचार (टीपीटी) केले जातात.
----------------------------------
क्षयरोग निदानाची सोय
जिल्ह्यात सरकारच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दर दोन लाख लोकसंख्येमध्ये एक सूक्ष्मदर्शक केंद्र स्थापन करून तज्‍ज्ञ व प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञाव्दारे क्षयरोग निदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावरून ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण भागात ३९ सुक्ष्मदर्शी केंद्राव्दारे क्षयरोग निदानाच्या सेवा सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रातून जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्‍या आहेत.
...............................
जिल्ह्यात ५५ निक्षयमित्रांची फळी
निक्षयमित्र संकल्पनेतून क्षयरुग्णांना दत्तक घेतले जाते. यांमध्ये नगरसेवक, खासदार, सामान्य व्यक्‍ती, समाजसेवक, खासगी संस्था यांचा समावेश आहे. क्षयरुग्णांना दरमहा पौष्‍टिक आहार व रेशन दिले जाते. जिल्ह्यामध्ये ५५ निक्षयमित्र म्हणून नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये उपचाराखाली असणारे तीन हजार १९८ क्षयरुग्ण असून, त्यापैकी दोन हजार ६३८ क्षयरुग्ण निक्षयमित्राना जोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण एक हजार ८०९ रुग्णांना रेशन वाटप करण्यात आलेले आहे.
...................................
जिल्ह्यात तीन हजार १९८ क्षयरुग्ण शोधण्यात आले आहेत. निदान झालेल्या सर्व रुग्णांना त्यांच्या राहत्या गावी उपचाराखाली ठेवण्यात आलेले आहेत. अत्याधुनिक तपास यंत्रणेमुळे, दररोज उपचार पद्धती, वजनानुसार ठरलेल्या मात्रेप्रमाणे रुग्णास औषध उपचार दिले जातात त्यामुळे क्षयरोगामुळे होणारे मृत्युचे प्रमाण कमी झालेले आहे.
-डॉ. गीता काकडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com