
‘कोमसाप’चा वर्धापनदिन उत्साहात
बोर्डी, ता. २६ (बातमीदार) : मधु मंगेश कर्णिक यांनी १९९२ मध्ये कोकण किनारपट्टीवरील साहित्यिकांना एकत्र करून कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. त्याला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही साहित्याची पालखी आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत नेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कोमसापचे कार्यकारिणी सदस्य तथा पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी केले. केंद्रीय कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त डहाणू शाखेतर्फे डहाणू पारनाका येथील साहित्य दालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डहाणू शाखाध्यक्षा डॉ. अंजली मस्करेन्हस उपस्थित होत्या. या वेळी शाखा कार्यवाह मेघा पाटील, कार्यकारिणी सदस्या रजनी ताजणे, माजी मुख्याध्यापक मदन कुमार ताजणे, डॉ. रोमिओ मस्करेन्हस, हर्षला नायर, शैलजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.