
रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या व्याप्तीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : उद्योजक निर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. उत्पादन क्षेत्राची ५० लाखांची मर्यादा एक कोटी; तर सेवा क्षेत्राची मर्यादा २० लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोकणातील उद्योगांना चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्राचाही या योजनेत समावेश करण्यात आल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
कुणबी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ठाणे येथील गडकरी रंगायत येथे शनिवारी (ता. २५) कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत, चेंबर्सचे अध्यक्ष अशोक वालम, कुणबी समाजोन्नती संघाचे भूषण बरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्योजकांना संबोधित करताना उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनात, वैयक्तिक आयुष्यात कुणबी समाजाचे मोठे योगदान आहे. मी उद्योगमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेत ओबीसी समाजाचा समावेश केला. या परिषदेच्या निमित्ताने १,४०० उद्योजक आज एकत्र आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आमचे अधिकारी विशेष कॅम्प घेतील, असेही ते म्हणाले.
उद्योग विभागाकडे अनेक योजना आहेत. त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. परदेशातून प्रकल्प येत आहेत. कुणबी समाजाने पुढाकार घेऊन कोकणात अल्ट्रा प्रोजेक्ट सुरू करावेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
लोगोचे अनावरण
कुणबी चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोगोचे आणि फेसबुक अकांऊटचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशात ते म्हणाले की, सरकार कुणबी समाजासोबत असून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.