छळवणुकीला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छळवणुकीला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या
छळवणुकीला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

छळवणुकीला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

sakal_logo
By

पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : तालुक्यातील कळंबोली आणि कामोठे भागातील दोन विवाहित महिलांनी पती व सासरकडील लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनांतील मृत महिलांचे पती व सासरकडील इतर मंडळींविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत; मात्र या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक केलेली नाही.

कळंबोलीमध्ये सारिका मिसाळ (वय २५) या विवाहितेने १७ मार्च रोजी पती संदीपान मिसाळ याच्याकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली. लग्नानंतर संदीपानने तिला आपल्या मूळ गावी नेऊन बळजबरीने शेतात काम करायला लावले होते. तसेच तिने हुंडा दिला नसल्याने तिचा सतत छळ सुरू केला होता. तसेच तिला मारहाणदेखील करत होता. कळंबोलीत राहण्यास आल्यानंतरही संदीपानकडून छळ सुरूच राहिल्याने सारिकाने आत्महत्या केली. कळंबोली पोलिसांनी संदीपान मिसाळ याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या
दुसऱ्या घटनेत ऐश्वर्या खोत (वय २८) या विवाहितेने २३ मार्च रोजी कामोठे सेक्टर २२ मधील साईकृपा सोसायटीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐश्वर्याचा वर्षभरापूर्वी लक्ष्मण खोत याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याने ऐश्वर्याला माहेरहून सोने आणण्यासाठी, खोली घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. ऐश्वर्याची नणंद वर्षा बेलदार ही त्याला भडकावत असल्याने तो छळ करत होता. तसेच त्याची प्रेयसी पल्लवी हिने ऐश्वर्याला शिवीगाळ करून तिचा अपमान केला होता. या छळाला कंटाळून गुरुवारी (ता. २३) दुपारी ऐश्वर्याने वडिलांना फेसबुक लाईव्हद्वारे संपर्क साधून आत्महत्या केली. या घटनेनंतर ऐश्वर्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून कामोठे पोलिसांनी तिच्या पतीसह त्याची बहीण व प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल केला.