
लोकलेखा समितीसमोर सर्व आरोपांना उत्तर देणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेचा ‘कॅग’ अहवाल विधानसभेत सादर झाला. या अहवालात पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले असतानाच, अहवालातील सर्व आरोपांबाबत लोकलेखा समितीपुढे उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे.
पालिकेने म्हटले आहे, की विधानसभेत सादर झालेला कॅगचा अहवाल प्रारूप असून, तो अंतिम नाही. कॅगने केलेल्या आरोपांबाबत आम्ही लोकलेखा समितीपुढे जाऊन सर्व आरोपांना उत्तरे देणार आहोत. आमचे म्हणणे समिती ऐकून घेणार आहे. यानंतर त्याचा ड्राफ्ट तयार होईल. समिती याबाबतची प्रश्नावली तयार करणार आहे. त्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देणार असून, प्रशासन आपली बाजू समितीसमोर मांडणार असल्याची माहिती प्रशानाने दिली. कॅगचे ऑडिट नऊ विभागांचे आहे. १२ हजार कोटींच्या कामांचे हे ऑडिट आहे. निविदा न काढता काही कामे देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आहे. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणा, असे निरीक्षण कॅगने अहवालात नोंदवले आहे.